TMC Meeting On Vice President Election: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारांची बैठक बोलावली आहे. आगामी संसद अधिवेशन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची 21 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.


पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "प्रत्येकाला सूचित केले जाते की ममता बॅनर्जी यांनी संसदेचे आगामी अधिवेशन आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पक्षाच्या योजनेवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे." निवेदनानुसार 21 जुलै रोजी संध्याकाळी ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे.


भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आज जगदीप धनकड यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. जगदीप धनकड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. जगदीप धनकड आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात वारंवार मतभेद झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या कृतीवर टीका देखील करण्यात आल्या आहेत. देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.


ममता बॅनर्जी यांनी भाजपवर साधला निशाणा 


तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला होता. द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यापूर्वी भाजपने विरोधी पक्षांशी बोलून त्यांच्याशी सल्लामसलत केली असती, तर त्यासर्वानुमते उमेदवार असू शकल्या असत्या, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार टीएमसीचे माजी नेते यशवंत सिन्हा आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: