Mali Mahasangh : राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या समर्थनार्थ अनेक संघटना आणि भुजबळ समर्थक रस्त्यावर उतरले आहे.
अशातच छगन भुजबळ यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्यानंतर आता माळी महासंघ ही मैदानात उतरलाय. छगन भुजबळ यांना मंत्री पद न दिल्यामुळे माळी समाजामध्ये काही लोकांची उग्र भावना आहे. याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच विचार करेल. रास्त मागणी लक्षात घेऊन भुजबळ यांना योग्य सन्मान येणाऱ्या काळात पक्ष देईल, अशी प्रतिक्रिया माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली आहे.
अजित पवारांनी भुजबळ यांच्या ऐवजी कुठलाही माळी मंत्री दिलेला नाही
साधारणपणे माळी समाजातून राज्याच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असायचे. आताही दोन मंत्री (अतुल सावे आणि जयकुमार गोरे) आहेत. त्यामुळे तो समतोल साधला गेला आहे. मात्र छगन भुजबळ यांची सिनयरिटी पाहून त्यांचाही समावेश मंत्रिमंडळात राहिला असता, तर माळी समाजाला आनंद झाला असता. अजित पवारांनी भुजबळ यांच्या ऐवजी कुठलाही माळी मंत्री दिलेला नाही. हे ही खरं असल्याचे अविनाश ठाकरे म्हणाले.
भुजबळ यांची 40 ते 50 वर्षांची कारकीर्द झाली आहे. भुजबळ एका जातीत अडकून राहिलेले नेते नाही, ते माळींचे आणि ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत, सर्वांची इच्छा होती त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं. मात्र ती इच्छा पूर्ण झाली नाही. आता समाजातील सर्वांशी बोलून पुढची भूमिका आम्ही घेऊ, असेही माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे म्हणाले.
छगन भुजबळ यांनी पक्षातच रहावे, पदाधिकाऱ्यांचा सूर..
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत आणि पक्षाकडून अपमानाची वागणूक मिळत असल्याच देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरातील भुजबळ समर्थकांची भुजबळ फार्म या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडली पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच मंत्रिपद भेटलच पाहिजे, पक्षात राहूनच काम करू असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा होता.
आणखी वाचा