पुणे : राज्यात गेल्या आठवडाभर चर्चेत असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव (Malegaon) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. कारखान्याच्या 21 पैकी 20 जागा जिंकत अजित पवार हेच चेअरमन होणार असल्याचे निश्चित झाले. त्याच अनुषंगाने आज बारामतीत अजित पवारांचे (Ajit pawar) भव्य स्वागत करण्यात आले. बारामतीत दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि,शिवनगर येथे निळकंठेश्वर पॅनलच्या विजयाबद्दल आयोजित बारामतीतील (Baramati) आभार मेळाव्याला उपस्थित राहत अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच, यावेळी निवडणूक काळातील पडद्यामागील गोष्टी व किस्सेही सांगितले. त्यामध्ये, आपण ही निवडणूक जुळवून घेण्याचा विचार करत होतो, मुख्यमंत्र्‍यांशी माझं तसं बोलणंही सुरू होतं. मात्र, काहींना स्वत:ची हवा वाटत होती, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. तसेच, क्रॉस वोटिंगवरुनही सभासदांना इशारा दिला.  

पॅनल निवडून आले तरी क्रॉस वोटिंग कुठं झालं, त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. कारखान्याची निवडणूक याआधी कधीही निवडणूक मी इतक्या गंभीरपणे घेतली नव्हती. मी सांगेल त्याच्या घरी गेलो, मला गरज होती म्हणून मला सांगेल त्या घरी गेलो. यामध्ये माझी बदनामी किती केली, खासगीकरणार बोलले गेलं असे म्हणत अजित पवारांनी निवडणूक काळातील प्रचारादरम्यानच्या आठवणी आणि होणारी टीका यावरुन भाष्य केलं. 

नेमकं कुठं फिस्कटलं

मी कुणाचा कायम दुश्मन नाही, मला देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत, मग माळेगाव मध्ये का मार्ग काढत नाहीत. थोडं पुढं मागे सरका, 10/10 आणि 21 वा मी. मुख्यमंत्री म्हणाले, अडीच-अडीच वर्षे वाटून घेऊ. पण, मी काही बोललो नाही. म्हणालो, तुम्ही सांगा, मग त्यांनी चर्चा केली आणि त्यांना कुणीतरी  सांगितले की हवा आपली असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी चंद्रराव तावरेंना लक्ष्य केलं. तसेच, मग सगळं इथंच फिस्कटलं असा किस्सा अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान घडल्याची माहिती विजयी सभेत दिली. मी 1991 साली कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभा होतो, त्यानंतर मी 95, 99 ला स्वतः मतमोजणीला उपस्थिती होतो. आपले उमेदवार मतमोजणी ला कुठे होते? उमेदवार होते कुठं? असं कसं तुम्ही करू शकता? हे बरोबर नाही, असे म्हणत अजित पवारांनी उमेदवारांवरही आपला संताप बोलून दाखवला. 

चुकीचं काही मला चालणार नाही

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही बोलले गेलं पण तिथं काहीही झालं नव्हतं. रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकर (शरद पवार गट), माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी मदत केली. आता, कारखाना निवडणुकीत निवडून आलेल्या 21 च्या 21 लोकांनी येऊन बसावं, सगळ्यांना सन्मानाने वागवले जाईल. तुम्ही सगळे सभासद ह्या कारखान्याचे चेअरमन आहात. माझ्या नावाचा वापर केला आणि चुकीचे काही केलं तर हे मला चालणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी निवडून आलेल्या सदस्यांना दमही भरला. 

ऊसाला चांगला दर देणार

इथे ठराविक लोकांना टेंडर दिली जातात असे कळलं आहे, हे चालणार नाही. डायरेक्टरच्या घरी व्यापारी गेला तर त्याला सांगा संचालक मिटिंगमध्ये मांड. आपल्याला पारदर्शक कारभार करायचा आहे. कामगाराने जर चुकीचे काम केलं आणि समजलं तर त्याची खैर नाही. माझा कारखाना जसा तोडणी वाहतूक करतो, तसे छत्रपती, माळेगाव सोमेश्वरला मी करणार आहे. माझ्या 70 एकरावर ठिबकचे काम करतो आहे, 3 वर्षाने बेणे बदलले पाहिजे. मी चेअरमन होणार म्हटल्यावर मला जास्त द्यावच लागणार, असे म्हणत अजित पवारांनी ऊसाच्या दराबाबतही भाष्य केलं. पाच वर्षे चेअरमन मीच होणार, कुणाच्या डोक्यात काही असेल तर काढून टाका, उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका. अनेकांनी माझ्यावर टीका केली, मला नाइलाजास्तव, पॅनल निवडून आणण्यासाठी, पुढाऱ्यांनी इकडे तिकडे केले असले तरी सभासदांनी विश्वास ठेवला म्हणून चेअरमन पदाची जबाबदारी मी घेतली आहे, असेही अजित पवारांनी सांगितले. 

मी सांगेन तेच काम करायचं - अजित पवार

शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊ शकतो, राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना आपल्याला करून दाखवायचा आहे. विरोधकांचे तोंड मला गप्प करायचे आणि त्यांना दाखवून द्यायचा आहे की, सहकारी कारखाना मी किती चांगल्या पद्धतीने चालवू होऊ शकतो. यावेळी, मिरवणूक काढण्यावरून अजित पवारांनी सर्वांचेच कान टोचले. कारखान्यात आता कामच करायचं, काम करायचं नसेल तर राजीनामा द्या आणि फिरा. एकदा सही केली त्याने कामच करायचे,जे लोकं निवडून आले त्यांनी मी सांगेल तसेच वागायचं. लोकांशी नीट बोललं तर लोकं मत देतात. काही लोकांनी आत्मचिंतन करावे, लोकांनी आपल्याला का नाकारले, असे म्हणत अजित पवारांनी पराभूत झालेल्या स्वतः च्याच उमेदवाराला टोला लगावला. 

हेही वाचा

हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास