मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 4 मतदारसंघांसाठी निवडणूक (Election) कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. त्यानुसार, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांमध्ये सध्या विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपानेही ही आमची हक्काची जागा असल्याचे सांगत मनसेला शुभेच्छा दिल्या आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रसने (NCP) मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे, महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, महायुतीच्या बैठकीशिवाय राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, महायुती व महाविकास आघाडीचे नेतेमंडळी व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यातच, अगोदर महायुतीतील मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर, आता राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे, या उमेदवारीवर आता भाजप व शिवसेना काय भूमिका घेतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्या आला. शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी देखील आग्रह धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शिक्षक मतदारसंसाठी शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2024 मुंबई शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव नलावडे, कार्याध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं तटकरे यांनी म्हटले प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
कोण आहेत शिवाजी नलावडे?
शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक व जिल्हाध्यक्ष राहिलेले असून, महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीमध्ये त्यांचे मोगदान मोलाचे राहिलेले आहे. गेले ३० वर्षे आशिया खंडातील अग्रस्थानी नसलेली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. मुंबई शहरात 2 शाळा उभारण्यात त्यांचा सहभाग असून शिक्षण मित्र म्हणून ते परिचित आहेत.