नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे मी केलेले वक्तव्य हे तोडून-मोडून दाखवण्यात आलं, काँग्रेसने वस्तुस्थितीचा विपर्यास केला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ज्या काँग्रेसने आतापर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केला त्याच काँग्रेसने हे कृत्य केल्याचा आरोप अमित शाहांनी केला. संविधानाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान करणाऱ्या पक्षात मी काम करतो असं अमित शाह म्हणाले. अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने टीका केली होती. त्यावर अमित शाहांनी प्रत्युत्तर दिलं. 


अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसने ज्या प्रकारे माझ्या वक्त्यव्याचा विपर्यास केला आहे, मी त्याचा निषेध करतो. काँग्रेस हा संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच न्यायव्यवस्थेचा अवमान केला आहे. देशात आणीबाणी लागू केली. संसदेत हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर आता खोटं पसरवण्याची तीच जुनी पद्धत काँग्रेसने सुरू केली. काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव करण्याचे काम केले. त्यांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले. पण देशात काँग्रेसची सत्ता नसताान आंबेडकरांना भारतरत्न मिळाले."


काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला


अमित शहा म्हणाले की, "1951-52 च्या निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. काँग्रेसने स्वतःच्या नेत्यांना भारतरत्न दिले. पण बाबासाहेबांना त्यापासून वंचित ठेवलं."


काँग्रेसने देशात नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची अनेक स्मारके बांधली. पण आंबेडकरांचे एकही स्मारक बांधलं नाही असा आरोप अमित शाहांनी केला. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचे स्मारक बांधले असं अमित शाह यांनी सांगितलं. 


काय म्हणाले होते अमित शाह? 


संसदेच्या दोन्ही सभागृहांत सध्या भारतीय संविधानावर चर्चा सुरु आहे. भारताच्या संविधानाचा अमृतमहोत्सव सुरू असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संविधानावर चर्चा होती. त्यात प्रत्येक राजकीय पक्षांकडून भाषणं सुरू आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधींपर्यंत नेत्यांनी संसदेत भाषणं केली. मंगळवारी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाहांचं भाषण झालं. हे भाषण तब्बल दीड तास चाललं.त्यामध्ये अमित शाहांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली. राजकीय मंचावर संविधानाची प्रत वापरण्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. पण हे करत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरून वाद सुरू झाला.


आजकाल आंबेडकर आबेडकर असं म्हणण्याची फॅशन झाली आहे. विरोधकांनी इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर त्यांना स्वर्गात जागा मिळाली असती असं वक्तव्य अमित शाहांनी केलं. त्यानंतर मात्र काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. 


ही बातमी वाचा: