छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे मेळावे, दौरै आणि प्रचारयंत्रणा कामाला लागल्या आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असल्याचे दिसून येते. महायुती म्हणून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-शिवसेना(उबाठा)-राष्ट्रवादी (शरद पवार) हे तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर विधानसभा क्षेत्रात हे कॉम्बिनेशन नेत्यांची डोकेदुखी ठरु लागलं आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथील महायुतीच्या बैठकीत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आमदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकजुटीचा मंत्र दिला आहे. तसेच, व्यासपीठावर असलेले मंत्री अतुल सावे (Atul save) यांच्या गळ्यातील गमछावरील चिन्हांवरुनही स्पष्टीकरण दिलं.  


छत्रपती संभाजीनगर महायुतीच्या समन्वयाची बैठक संपन्न झाली. मात्र, महायुती समन्वयाच्या बैठकीतच असमन्वय दिसून आला. कारण, व्यासपीठावर चर्चा रंगली ती मंत्री अतुल सावे यांच्या गळ्यातील गमछाची. अतुल सावे यांच्या गळ्यात असलेल्या गमछावर एक बाजूला शिवसेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला कमळांचे चिन्ह होतं. मात्र, त्यावर महायुतीमधील राष्ट्रवादीच्या घड्याळाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, या गमछाबाबत विचारणाही केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुतीतील घटकपक्षांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचं उघड झालं. पण, मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला असून सामंत यांनी आपल्या भाषणातून अतुल सावेंच्या गळ्यातील गमछाबाबत माहिती दिली. 


अतुल सावे यांना व्यासपीठावरच उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचं निशाण कुठं आहे, असा प्रश्न केला होता. त्यावर सावे यांनी काय उत्तर दिले हे उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. मगाशी अनिकेतजी म्हणाले की, अतुल सावेंच्या गळ्यातील गमछामध्ये दोनच पक्ष आहेत. पण, अजिबात काळजी करु नका, त्यांनी मला सांगितलंय की, अजित दादा आल्यापासून घड्याळ माझ्या ह्रदयात आहे, असे उदय सामंत यांनी आपल्या भाषणावेळी म्हटले. 


महायुती म्हणून आपण एकसंघाने गेल्यावर कोणतीही ताकत आपल्याला रोखू शकत नाही. आपण एका पक्षाचा जयजयकार करण्यापेक्षा महायुतीचा जयजयकार करुया. महायुतीनेच 288 जागा लढायच्या आहेत, लोकसभेत जे झालं ते विधानसभेत झालं नाही पाहिजे. जो फेक नरेटीव्ह सेट झाला तो झाला, मात्र विधानसभेला आपण त्याला उलथून पाडू, असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने, एकदमाने काम करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी बैठकीतून केल्या आहेत. 


हेही वाचा


मनसेचा राडा... मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळखट्याक