मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. कालपर्यंत महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा असणार हे स्पष्ट असले तरी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या बैठकीनंतर लोकसभा जागावाटपातील तब्बल 32 जागा या भाजपच्याच (BJP) वाट्याला येतील, अशी शक्यता समोर आली आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही गटांच्या वाट्याला प्रत्येकी 10 पेक्षा कमी जागा येण्याची शक्यता आहे. मोठ्या अपेक्षेने भाजपसोबत आलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कालपर्यंत महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत शिंदे गट 12 ते 13 आणि अजित पवार गट 6 ते 10 जागांच्या मागणीवर ठाम होता. परंतु, अमित शाह यांनी मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या बैठकीनंतर हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. काल रात्री सर्वप्रथम भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली होती. आज पुन्हा अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजप लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवू शकतो, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याला जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळाला पाहिजे, हे अमित शाह यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित शाह हे जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर ठाम आहेत. सध्याच्या घडीला शिंदे गट आणि अजित पवार गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची जिंकून येण्याची क्षमता जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झुकते माप घ्या, असा स्पष्ट संदेश अमित शाह यांच्याकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचे समजते.
भाजपचा माईंड गेम
महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही जण आपापल्या पक्षांसाठी अनुक्रमे 13 आणि 10 जागांची मागणी केली होती. भाजप नेतृत्त्वाकडून एक किंवा दोन जागा कमी करुन शिंदे गट आणि अजित पवार गटाचा हा प्रस्ताव मान्य होईल, अशी चर्चा होती. परंतु, अमित शाह यांच्या बैठकीत वेगळेच चित्र समोर आले. भाजप महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 32 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली. भाजपकडून लोकसभेच्या या प्रत्येक जागेवर सर्वेक्षण करुन आपला उमेदवार जिंकेलच, याची खात्री करुन घेण्यात आली आहे.
अमित शाह यांनी हीच बाब एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पटवण्याचा प्रयत्न केला. शिंदे गट किंवा अजित पवार गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची जिंकून येण्याची क्षमता जास्त आहे, हे अमित शाह यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला. अमित शाह यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धक्का बसण्याबरोबरच हे दोन्ही नेते काहीसे बुचकाळ्यात पडले आहेत. मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर बुधवारी सकाळी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पुन्हा एकदा अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाही वाटाघाटीसाठी बोलावून घेतले. परंतु, अमित शाह जिंकून येण्याची क्षमता या निकषावर ठाम आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातून लोकसभेच्या 32 जागा लढवल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटावर 10 पेक्षा कमी जागांवर लढण्याची नामुष्की ओढावू शकते.
आणखी वाचा
शाहांनी मुंबईत चाचपणी करताच फडणवीसांसह भाजप नेत्यांनी दिल्ली गाठली; शिंदे-अजित पवार मागे हटेनात!