मुंबई : बेळगाव कारवारसह महाराष्ट्र (Maharashtra) अजून झालेला नाही, तो भाग ज्यावेळी महाराष्ट्रासोबत जोडला जाईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पूर्ण होईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अवघ्या महाराष्ट्राची ओळख सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र स्थापनेचा 65 वा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असून दरवर्षी 1 मे रोजी हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. तत्पूर्वी अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. येथील कार्यक्रमातून पुन्हा एकदा कर्नाटकच्या सीमारेषेलगत असलेल्या कारवार, बेळगावचा मुलूख आपलाच असल्याचं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनला आहे. 1986 साली कोल्हापूरमध्ये सीमापरिषद झाली. या परिषदेला एस. एम. जोशी, शरद पवार, माधवराव गायकवाड गोविंद पानसरे असे दिग्गज सहभागी झाले होते. त्यावेळी विरोधी पक्ष नेते असलेले शरद पवार सत्याग्रह करण्यासाठी गनिमी काव्याने बेळगावात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुन्हा कोल्हापूरमध्ये सोडले. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच, महाराष्ट्र दिनानिमित्तच्या कार्यक्रमात अजित पवारांनी महाराष्ट्र अद्यापही पूर्ण नसल्याची खंत बोलून दाखवली. 

महाराष्ट्राच्या विकासावर भाष्य

सध्या एआयचं युग आहे, आज पत्रकार भावे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 35 कोटी होतो. आता, 135 कोटी झालो आहोत. आम्ही टँकरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेतीला मदत व्हावी म्हणून एआयसाठी 500 कोटी रुपये तरतूद केली आहे. त्यामुळे पाणी बचत व खतांची देखील बचत होईल, असे अजित पवार यांनी म्हटले. बुलेट ट्रेनची आपल्याला गरज आहे, कारण जपान-चायना बुलेट ट्रेनमुळेच पुढे गेले आहेत. कोकण रेल्वेची नवीन लाईन टाकणार आहोत, यासंदर्भात आम्ही आज पंतप्रधानांसोबत  बोलत होतो, अशी माहितीही अजित पवारांनी दिली. दरम्यान, शिव, शाहू, फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन आम्ही काल चालत होतो, आजही चालत आहोत आणि उद्या देखील चालत राहणार आहोत असेही अजित पवारांनी भाषणातून स्पष्ट केले. 

हेही वाचा

धक्कादायक! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली