Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 150 मतदारसंघ ठरवून एका ॲपच्या माध्यमातून दहा हजार मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) केला आहे. हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, ज्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे ते मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने दिला आहे. असे असताना राज्याच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 853 बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. तर दुसरीकडे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात तब्बल 6, 853 बनावट नावं
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 853 बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. मतदारांच्या ऑनलाईन नोंदणी दरम्यान प्रशासनाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे ही अर्जदारांची चूक आहे की संघटित कृत्य? याची आता चौकशी होणार असून या प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजुरा पोलीस येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून Voter Helpline App किंवा NVSP Portal च्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र, काही लोकांनी या सुविधेचा गैरवापर करून बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. प्रशासनाकडून या बाबत चौकशी सुरु असतांना कोरपना तालुक्यातील लखमापूर गावातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नावं सामील करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून आलय.
तुळजापूर मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज, 40 जणांवर पोलिसात गुन्हा
दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. मात्र या बोगस मतदार नोंदणी रॅकेटच्या मास्टर माईंड कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला आहे.
तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक आणि वेळ एकसमान असल्याचेही दिसून आले आहे. भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. मतदान नोंदणीसाठी फॉर्म 6 भरताना स्थानिक नागरिक असल्याचे जोडलेले पुरावे बोगस आहेत. दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हे ही वाचा