अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या नवीन राज्य कार्यकारिणीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली आहे. या कार्यकारिणीत अकोल्यातून प्रा. डॉ. धैर्यवर्धन फुंडकर यांची उपाध्यक्षपदी तर महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. भारिप-बहूजन महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. तर मावळत्या जंबो कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. 


2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहूजन आघाडीत विलीन करण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने तब्बल 42 लाख मतं घेतली होती. तर मित्रपक्ष असलेल्या 'एमआयएम'नं औरंगाबादची जागा जिंकली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिप-बहूजन महासंघाचं औपचारिकपणे वंचित बहूजन आघाडीत विलीनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आंबेडकरांनी पक्षाची जंबो कार्यकारिणी जाहीर केली होती. मात्र, आधीच्या कार्यकारिणीतील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षात प्रवेश केले होते. तर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी पक्षात मोठ्या तक्रारी होत्या. या सर्वांना आंबेडकरांनी नवीन कार्यकारिणी निवडतांना पद्धतशीरपणे पदांपासून दूर ठेवलं आहे. 




कार्यकारिणीत सर्व घटकांना संधी : 
प्रकाश आंबेडकरांनी नवीन कार्यकारिणी निवडताना आपल्या पक्षाच्या नावातील 'वंचित' आणि 'बहूजन' घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय कार्यकारिणीत माजी कुलगुरू, माजी पोलीस अधिकारी, शिक्षणतज्ञ अशा 'अभिजन' घटकांतील लोकांना स्थान देत पक्षाला सुशिक्षित प्रतिमा देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण सावंत, माजी पोलीस अधिकारी ॲड. धनराज वंजारी, शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना स्थान देण्यात आले आहे. यासोबतच तृतीयपंथीय विकास महामंडळाच्या सदस्य आणि तृतीयपंथीयांच्या चळवळीतील दिशा पिंकी शेख यांच्याकडेही उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच अतिशय गरिब परिस्थितीतून समोर आलेले आणि सलून व्यवसाय करणारे नांदेड जिल्ह्यातील नाभिक समाजातील कार्यकर्ते गोविंद दळवी यांचीही पक्षाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. दिशा पिंकी शेख आणि गोविंद दळवी हे जून्या कार्यकारिणीत पक्षाचे प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. नविन कार्यकारिणीत दोघांनाही पक्षाच्या उपाध्यक्षपदी बढती मिळाली आहे. यासोबतच पक्षाचे सर्व विभागीय अध्यक्ष कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य असतील. कार्यकारिणीवर पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर, महासचिव अरूंधती शिरसाट यांच्यासह युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा कार्यकारिणीत सदस्य असतील. 




प्रत्येक पदाधिकाऱ्यावर विशेष जबाबदारी : 
प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकारिणीतील प्रत्येक उपाध्यक्षाकडे पक्षाच्या धोरणातील महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. दिलेल्या जबाबदारीसंदर्भातील पक्षाची ध्येयधोरणं आणि भूमिका ठरविण्याचे  अधिकार या पदाधिकाऱ्यांकडे असणार आहे. ज्येष्ठ उपाध्यक्ष ॲड. विजय मोरे यांच्याकडे प्रशिक्षण, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे कृषी धोरण, किसन चव्हाण - आदिवासी संघटन, अनिल जाधव - वडार समाज संघटन, गोविंद दळवी - निवडणूक व्यवस्था आणि कार्यालय प्रशासन, दिशा पिंकी शेख - तृतीय पंथीयांचे संघटन, सिद्धार्थ मोकळे - समन्वयक प्रवक्ता, सभासद नोंदणी आणि संघटन विस्तार, सोमनाथ साळुंखे आणि नागोराव पांचाळ यांच्याकडे ओबीसी संघटन अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ उपाध्यक्ष ॲड. धनराज वंजारी, डॉ. अरूण सावंत आणि  सर्वजित बनसोडे यांच्यावर कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. सोबतच आधीच्या कार्यकारिणीतील डझनभर प्रवक्ते कमी करीत आता फक्त नांदेडचे फारूख अहमद यांच्यासह ॲड. प्रियदर्शी तेलंग असे दोनच प्रवक्ते असणार आहेत. नवीन कार्यकारिणीत सर्वचजण प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासातील आहेत. आधीच्या कार्यकारिणीतील अनेकजणांनी ऐनवेळी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केले होते. त्यामुळे यावेळी आंबेडकरांनी नवीन कार्यकारिणीत विश्वासू निकटवर्तियांची वर्णी लावली आहे. 




अशी आहे वंचित बहुजन आघाडीची नवी राज्य कार्यकारिणी : 


ज्येष्ठ उपाध्यक्ष :


नाव                         जबाबदारी
ॲड. विजय मोरे            प्रशिक्षण
डॉ. अरूण सावंत              --
ॲड. धनराज वंजारी          --




उपाध्यक्ष


नाव                                जबाबदारी
प्रा.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर    कृषी धोरण
किसन चव्हाण              आदिवासी संघटन
अनिल जाधव                वडार समाज संघटन
गोविंद दळवी                निवडणूक व्यवस्था, कार्यालय प्रशासन
दिशा पिंकी शेख            तृतीय पंथीयांचे संघटन
सिद्धार्थ मोकळे             समन्वयक प्रवक्ता,सभासद नोंदणी, संघटन
सोमनाथ साळुंखे          ओबीसी संघटन
नागोराव पांचाळ          ओबीसी संघटन
सर्वजित बनसोडे        --


राज्य प्रवक्ते :


फारूख अहेमद
ॲड. प्रियदर्शी तेलंग




कार्यकारिणी सदस्य : 


निलेश विश्वकर्मा : युवा आघाडी
रेखा ठाकूर : महिला आघाडी
अरूंधती शिरसाट : महिला आघाडी 
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई विभागाचे विभागीय अध्यक्ष. 




विशेष निमंत्रित सदस्य : 


अशोक सोनोने
कुशल मेश्राम




वंचित बहुजन आघाडीसाठी सध्याचा काळ राजकीय संक्रमणाचा आहे. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर पक्षाचं कमी झालेलं वलय परत मिळविण्यासाठी नवीन कार्यकारिणीला प्रयत्न करावे लागतील. सोबतच फक्त राजकीय प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना राजकारणात टिकून राहण्यासाठी आता पक्षाचा आकडा आणि मतांचा टक्का वाढवावा लागेल. राज्यात वर्षभरात होऊ घातलेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला चांगलं प्रदर्शन करता आलं तरच पक्ष आणि पर्यायानं नव्या कार्यकारिणीलाही भवितव्य असेल, हे मात्र निश्चित.