Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीचा एखादा रेडा घेऊन गुवाहाटीला जायला पाहिजे, असं उत्तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सहकुटुंब आसामच्या गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला गेले आहेत. मात्र अब्दुल सत्तारांसह काही आमदार या दौऱ्यावर गेले नाहीत. अब्दुल सत्तारांनी आपण न जाण्याचं कारण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं. 


अब्दुल सत्तार म्हणाले, "रेड्याचा बळी ही धार्मिक भावना आहे. त्यासाठी अजितदादांनी एकदा स्वत: गुवाहाटीला जायला पाहिजे. एखादा बारामतीचा रेडा घेऊन जायला हवं आणि बळी द्यायला हवा. चांगलं आहे ना. मला वाटतं ज्यांना ज्यांना देवीला बळी चढवायचा असेल, त्यांनी आपल्या गावाचा चांगला रेडा बळी द्यायला हवा." 


अजित पवार काय म्हणाले होते? 
"काल मला मुंबईच्या पत्रकारांनी सांगितलं, खरं खोटं मला माहित नाही. ती माहिती म्हणजे गुवाहाटीतील हॉटेलच्या मालकाने बिल थकलं म्हणून आत्महत्या केली. बिल दिलं नाही म्हणून आत्महत्या केली की कारण दुसरं आहे ते मला माहिती नाही. मुंबईच्या पत्रकारांमध्ये तशी चर्चा तर आहे. आता पुन्हा ते (एकनाथ शिंदे गट) दर्शनाला चाललेत. काही ठिकाणी बकरं कापतो, कोंबडा कापतात, तसं गुवाहाटीत रेडा कापतात. म्हणजे बळी देतात. आता ते कशाचा-कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही. परंतु ते दर्शनाला जात असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो" 


अब्दुल सत्तारांचा विरोधकांवर हल्लाबोल 
दरम्यान, अब्दुल सत्तारांनी अजित पवारांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. "तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत यात कोण कोणाला हात दाखवेल ते कळेल. उद्धव ठाकरे यांनी आधीच दौरे केले असते तर ही वेळ आली नसती. अडीच वर्षांत फक्त चार वेळात मंत्रालयात गेले. उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा हे सांगणारा मीच होतो. पण शरद पवार, सोनिया गांधी यांची अनुमती आवश्यक होती, मी छोटा कार्यकर्ता" असं अब्दुल सत्तार म्हणाले.


मुख्यमंत्र्यांसह आमदार-खासदार गुवाहाटीला
शिंदे गटाचे मंत्री, आमदार, खासदार आज गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं. तिे त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला गेले आहेत.