Dharashiv: आगामी विधानसभा निवडणूकांचे आता सर्व पक्षांसह इच्छूक उमेदवारांनाही वेध लागले असून मराठवाड्यात उमेदवारीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पटापट उड्या मारल्या जाऊ लागल्या आहेत. आता धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे शिंदे गटात प्रवेश करणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशासाठी शेकडो वाहनांचा ताफा घेऊन परंडा शहराकडे कापसे आणि त्यांचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत. 


कळंबमधील ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शुक्रवारीच ठाकरे गटाला रामराम केला असून आज शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबतीला घेत ढोल- ताशांच्या गजरात त्यांनी शिंदे गटाच्या दिशेने मिरवणूक काढली आहे. आज धाराशिव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवाजी कापसे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.


मागील विधानसभेसाठीही डवलल्याने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी


शिवसेना फुटीनंतर अनेक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभेत ठाकरे गटाला मोठा फटका बसला. त्यानंतर धाराशिवमधील कळंबचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजी कापसे मागील विधानसभा निवडणूकांसाठीही इच्छूक होते. मात्र, पक्षाने कापसे यांना डावलून कैलास पाटील यांना उमेदवारी दिल्याने कापसेंचा नाराजीचा सूर होता. यंदाही विद्यमान आमदार कैलास पाटील यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता असल्यानं कापसे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.


शेकडोंचा ताफा घेऊन रुफटॉपमधून  रामराम


धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या शिवाजी कापसे यांनी शेकडोंचा ताफा घेत परंड्याकडे रवाना झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात पक्षप्रवेशासाठी परंड्याला जाण्यास निघाले असून कारच्या रुफटॉपमधून त्यांनी कार्यकर्त्यांना रामराम घातल्याचं दिसून आलं.