Marathwada NCP MLA: राष्ट्रवादी पक्षात झालेल्या गटबाजीनंतर आता दोन गट आमने-सामने पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांची जमवाजमव दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठवाडा विभागातील राष्ट्रवादी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, मराठवाड्यातील 'राष्ट्रवादी' अजित दादांसोबतच असल्याचे चित्र आहे. अकरापैकी सात आमदारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पाठींबा दिला आहे. मराठवाड्यात असलेल्या 11 राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी विधानसभेवर निवडणून आलेले 8 आणि विधानपरिषदेचे 3 आमदार आहेत. त्यातील विधानसभेचे पाच आणि विधानपरिषदेचे दोन आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. तर उरलेले विधानसभेचे 3 आणि विधानपरिषदेचं एक असे चार आमदार शरद पवारांसोबत (Sharad Pawar) आहेत. 


मराठवाड्यात कोण कोणासोबत? 


छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार विधानसभेवर निवडून आलेला नाही. मात्र विधानपरिषदेवर निवडून आलेले शिक्षक आमदार विक्रम काळे आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे दोन्ही आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. तर विक्रम काळे स्वतः मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित होते. तसेच माजी आमदार प्रा. किशोर पाटील. विजयअण्णा बोराडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, सुधाकर सोनवणे, छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, मयूर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले. तर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील अजित पवारांच्या गटात आहेत. 


बीड : मराठवाड्यात सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार बीड जिल्ह्यात आहेत.  मात्र यातील परळीचे आमदार  धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके आणि  पाटोद्याचे आमदार बाळासाहेब अजबे हे सुद्धा अजित पवारांसोबत आहे. तर उरलेले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या गटात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन अजित पवार आणि एक आमदार शरद पवारांच्या सोबत आहेत. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक  जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर अजित पवारांच्या बैठकीत उपस्थित होते. 


लातूर : लातूर जिल्ह्यात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. संजय बनसोडे यांनी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे देखील अजित पवारांच्या सोबत आहेत. तसेच शहराध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष भरत सूर्यवंशी, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, लातूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, माजी नगरसेवक नवनाथ अल्टे आदी पदाधिकारी अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार यांच्या बैठकीला प्रदेश कार्यकारिणीतील प्रदेश सचिव बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, प्रदेश सरचिटणीस आशा भिसे यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख आदी उपस्थित होते.


हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकमताने शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी मुंबईत शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली. वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे मात्र प्रचारात व्यस्त आहेत.  मात्र, मतदारसंघात परतताच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे हिंगोली जिल्हा शरद पवारांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


परभणी : परभणीचा विचार केल्यास राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान, विधान परिषदेचे आमदार जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजयराव गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावल्याचे दिसून आले. तर अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यासह काहीजण उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar : लोकांना अजूनही वाटतंय शरद पवारच या खेळामागचे सूत्रधार; वाचा त्यामागची ही सहा कारणं