Uddhav Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.  कलानगर सर्कलजवळ उद्धव ठाकरे यांनी खुल्या कारमधून भाषण करत पुन्हा एका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. ''महाशिवरात्री आधी शिवधनुष्य चोरीला गेलं आहे, आता तेच शिवधनुष्य घेऊन निवडणुकांना सामोरे जा', असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं खुल्या गाडीतील भाषण ऐकून अनेकांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 मध्ये गाडीच्या टपावरून भाषण दिलं होतं.   अनेक लोक आता बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) हा फोटो कधीच आहे? त्यांनी केव्हा हे भाषण केलं होतं, याबाबत सर्च करत आहे. याचबद्दल आपणही जाणून घेऊ... 


Balasaheb Thackeray Historic Photos: नेमका कधीचा आहे हा फोटो?


तो काळ होता शिवसेनेच्या (Shiv Seva) उभारीचा आणि सीमा आंदोलनाचा. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून इतर महाराष्ट्रातील संघटनांप्रमाणे शिवसेनाही आंदोलन करत होती. त्यावेळी बेळगावात जमावबंदी असताना महाराष्ट्र एकीकरण समितीने सभा बोलावली आणि खुद्द बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्या दिवशी बेळगावात दणदणीत भाषण केलं. याच सभेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पाहिल्यांदा सीमा आंदोलनाची हाक दिली आणि वातावरण पेटतं ठेवलं. त्यांनी 20 जानेवारी रोजी इंदिरा गांधी यांना प्रकरणासंदर्भात पत्र लिहिलं आणि 26 जानेवारीपर्यंत तोडगा काढण्यास विनंती केली. पण त्याच पात्रात त्यांनी  सरकारने तोडगा न काढल्यास काँग्रेसच्या एकही नेत्याला मुंबईत (Mumbai) येऊ देणार नाही, अशी ताकीदही दिली. मात्र तो ही दिवस निघून गेला आणि सरकार दरबारी काहीच हालचाल झाली नाही. पण पत्रात लिहिलेलं वाक्य बाळासाहेबांनी खरं केलं. 27 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबईत आले असता एअरपोर्ट ते वरळी नाक्यापर्यंत 5 वेळा शिवसैनिकांनी त्यांचा ताफा रोखला. अखेर चव्हाण यांनाच आपला मार्ग बदलावा लागला. पूढे बाळासाहेबांनी अनेक पक्षांना एकत्र आणलं आणि मुंबईत जोरदार सभा घेतल्या.


दरम्यान, 7 फेबरीवरी 1969 रोजी देशाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. त्यांचा ताफा थांबवायचा आणि त्यांना निवेदन द्यायचं, असं शिवसेनेत ठरलं. त्या दिवशी माहीम कॉजवेजवळ हजारो शिवसैनिक मोरारजी देसाईंची वाट पाहत होते. रस्त्याच्याकडेला स्वतः बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) देखील आपल्या गाडीत बसले होते. त्यांच्या शेजारी होते मनोहर जोशी. सगळेच मोरारजी देसाई यांची वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आला. मोरारजी यांचा ताफा येताच शिवसैनिक जवळ गेले, पण पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि राडा झाला. मोरारजींच्या ताफा न थांबता सुसाट निघाला. हे पाहता सत्याकांत पेणकर या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनं मोरारजींच्या कार समोर झेप घेतली. पण पेणकर यांना चिरडून मोरारजी देसाईंचा ताफा निघून गेला. सत्याकांत पेणकर यांचा दुर्दैवी अंत झाला. मात्र या घटनेमुळे वातावरण चांगलंच चिघळलं. शिवसैनिक पेटून उठले. कारण संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्याचा पहिला बळी गेला होता. त्यावेळी मुंबईत गाडीच्या टपावरुन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. त्याचवेळी बाळासाहेबांचं हे छायाचित्र टिपण्यात आलं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.