Satyajeet Tambe : ''राजकीय साक्षरता हा आपल्या देशातील सगळ्यात महत्त्वाचं विषय आहे. चांगल्या लोकांच्या पाठीशी कसं उभं राहायचं, त्यांना पुढं कशी संधी द्यायची आणि बाकी कुठल्याही बंधनामध्ये अडकण्यापेक्षा चांगलं काम करणारे लोकांना कशा पद्धतीने संधी मिळेल, या दृष्टीने योग्य विचार करून मतदान करणे हा एक महत्वाचा भाग आहे'', असं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी म्हटलं आहे. अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत असताना ते असं म्हणाले आहेत. ''आपल्या देशामध्ये साक्षरता आता चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आता आपल्या जवळ जवळ 90 - 95% लोकांना लिहिता वाचता येते. परंतु अजूनही विचार करून मतदान करणं ही जी प्रक्रिया आहे, ती थोडीशी कुठेतरी अजूनही वाढवणं गरजेचं आहे. म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये देखील राजकीय साक्षरता विषयाला पाहिजे हा असा माझा आग्रह राहणार आहे,'' असं आमदार तांबे म्हणाले.


शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले आहेत की, ही खूप तांत्रिक बाब आहे. एका बाजूला त्या पक्षाची घटना दुसऱ्या बाजूला आता असलेले लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्यातून निवडणूक आयोगाने इतका तांत्रिक पद्धतीने निर्णय दिला आहे. तो निर्णय समजून घेणे आणि त्याच्यावर अभ्यास करणे हाच कायदे पंडितांसाठी देखील एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे, असं सत्यजित तांबे म्हणाले.


''नाशिक (Nashik) पदवीधरचा निकाल लागल्यानंतर सातत्याने मला भेटणाऱ्यांची संख्या जास्त आहे. संगमनेरला ही हजारो लोक येऊन मला भेटून जात आहे, अभिनंदन करत आहेत. मी पण आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये आभाराच्या निमित्ताने फिरतोय. हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे, अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगाव चोंडी पासून ते गुजरात राज्याची बॉर्डर असलेल्या धडगावपर्यंत, असा मोठा हा मतदारसंघ साडेपाचशे किलोमीटर आडवा उभा मतदार संघ आहे. त्यामुळे सगळीकडे फिरण्याचा मी प्रयत्न करतोय आणि सगळ्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करतोय, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून कशा पद्धतीने भविष्यात काम करायचं याची थोडीशी रूपरेषा देखील ठरवण्याचा प्रयत्न करतोय'', असं सत्यजित तांबे म्हणाले.


अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात भाजपने आपल्याला उघडपणे मदत केली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण नेमकी काय भूमिका घेणार यावर बोलताना सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष आहोत, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, सर्वच पक्षांनी आपल्याला मदत केली आहे. तर खासदार सुजय विखेंची आपण भेट घेणार का? असं विचारलं असता यावर बोलताना तांबे म्हणाले की, ते साध्य परदेशात आहेत. आपण लवकर त्यांचीही भेट घेणार आहोत.