Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Result मुंबई : महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा निवडणुका घेण्यात आल्या आणि आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालात सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्षांनी मोठं यश मिळवलं आहे. भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे किती ठिकाणी नगरसेवक निवडून आले ते जाणून घेणार आहोत. 

Continues below advertisement

भाजप सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्रात सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता.  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपचे 120 नगराध्यक्ष निवडून आले आहेत.  भाजपची ही राज्यातील आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. भाजपनं पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात चांगली कामगिरी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अर्धशतक 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं देखील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यातील 54 नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेनं भाजप, शेकापच्या पॅनेलला पराभूत केलं. कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले, निलेश राणे यांनी चांगली कामगिरी केली आहे. कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवेसना पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सोलापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नाशिकमध्ये 11 पैकी 5 ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झालेत. पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू येथे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत. 

Continues below advertisement

अजित पवारांनी पॉवर दाखवली 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 40 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. अजित पवारांनी पुणे जिल्ह्याच्या होम ग्राऊंड पुन्हा चांगली कामगिरी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे जिल्ह्यातील 17 नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी 10 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत.  एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर आणि पाचगणीत नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. कोल्हापूर, बीड जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे. 

महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष 

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षानं सर्वात चांगली कामगिरी केली आहे.  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं 34 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. अहिल्यानगर, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 7 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उरुण ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेत पक्षानं यश मिळवलं. रायगडमधील उरण येथे देखील राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर विजयी झाल्या. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निर्णय सोपवले होते. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  8 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. सोलापूरमधील कुर्डूवाडी, रायगडमधील श्रीवर्धन यासह इतर ठिकाणी शिवेसना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष विजयी झालेत. 

वंचित बहुजन आघाडीला देखील या निवडणुकीत यश मिळालं आहे. वंचित बहुजन आघाडीनं अकोल्यातील बार्शी टाकळी आणि अमरावतीमधील चांदूर रेल्वे नगरपरिषेदत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. स्थानिक आघाड्यांचे 23 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेत.