Maharashtra Ministers Portfolio : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं (Maharashtra Cabinet) खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आठ मंत्र्यांकडील सध्याचं खातं आणि अतिरिक्त खातं

मंत्री                     सध्याचं खातं                                    अतिरिक्त खातंउदय सामंत          उद्योग                                               माहिती आणि तंत्रज्ञानशंभूराज देसाई      राज्य उत्पादन शुल्क                            परिवहनदादा भुसे             बंदरे व खनिकर्म                                  पणनसंजय राठोड        अन्न व औषध प्रशासन                           सामाजिक न्याय व विशेष सहाय्यतानाजी सावंत       सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण       मृद व जलसंधारणअब्दुल सत्तार        कृषी                                                  आपत्ती व्यवस्थापनदीपक केसरकर  शालेय शिक्षण व मराठी भाषा                   पर्यावरण आणि वातावरणीय बदलसंदीपान भुमरे      रोजगार हमी योजना व फलोत्पादन          अल्पसंख्याक व औकाफ

मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक खाती पण महत्त्वाची खाती फडणवीसांकडेराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलं. खाते वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाती जास्त आली असली तरी महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याचं दिसतं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन तसंच नगरविकास खात यासह इतर महत्त्वाची खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, ऊर्जा तसंच जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

इतर 18 मंत्र्यांची खाती 

1. राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2. सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4. डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास

5. गिरीष महाजन - ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

6. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 

7. दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 

8. संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन

9. सुरेश खाडे - कामगार

10. संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन

11. उदय सामंत - उद्योग

12. प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

13. रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

14. अब्दुल सत्तार - कृषी

15. दीपक केसरकर - शालेय शिक्षण व  मराठी भाषा

16. अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17. शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

18. मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास