Imtiyaz Jaleel On  BJP : कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरुनच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. "राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांना भाजप जबाबदार असून, सत्तेच्या लालसापोटी भाजप कोणाचीही हत्या करु शकते. त्यांचा तो इतिहास आहे, असं जलील म्हणाले. 


यावेळी बोलताना जलील म्हणाले की, "कोणी तरुणांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले असतील. पण याच अर्थ असे होत नाही की संपूर्ण शहर बंद करायला पाहिजे. त्यासाठी भव्य असा मोर्चा काढून संपूर्ण शहराचे लोक रस्त्यावर येतात. त्यानंतर दगडफेक होते, लाठीचार्ज करण्यात येते हे कितपत योग्य आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे कोल्हापुरात राहणाऱ्या 99 टक्के लोकांना शाहू महाराज यांचे कार्य काय होते हेच माहित नसल्याची आज मला खात्री पटली आहे. सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. त्यामुळे कोल्हापूरसारख्या शहरात असा गोंधळ घातला जात असेल तर हे निंदनीय असल्याचे जलील म्हणाले. 


भाजपकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न 


अचानक राज्यात औरंगजेबाचे फोटो कसे झळकू लागले असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. गेल्या 75 वर्षात औरंगजेब कसा दिसतो हे आम्हाला देखील माहित नव्हते. पण अचानक हे फोटो आणि पोस्टर कोठून आले. का तुम्ही एवढ्या वर्षांनी हे फोटो बाहेर काढले. तसेच तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहात? माझा स्पष्ट आरोप आहे की, कर्नाटकात मिळालेल्या अपयशानंतर सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. जोपर्यंत दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण सत्तेत येऊ शकत नाही हे भाजपला माहित आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करुन सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 


तर भाजप सत्तेमध्ये येण्यासाठी किती लोकांची बळी घेणार हे तुम्हाला माहितच नाही. सत्तेच्या लालसापोटी ते कोणाचीही हत्या करु शकतात. कोणालाही मारु शकतात, दंगली घडवू शकतात. भारतीय जनता पार्टीचा हा इतिहास आहे. राज्यात देखील त्यांच्याकडून असेच काही करण्यात येत असल्याने मला काही आश्चर्य वाटत नाही, असेही जलील म्हणाले. 


...तर वादग्रस्त फोटोंवर कायद्याने बंदी आणली पाहिजे


गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी औरंगजेबाचे फोटो झळकत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जलील म्हणाले की, ज्याप्रमाणे सरकार काही संघटनांवर बंदी घालते त्याचप्रमाणे वादग्रस्त फोटोवर देखील बंदी घातली पाहिजे. ज्यांच्याकडे त्याचे फोटो दिसले त्यांना तुरुंगात टाकू असे सांगितले पाहिजे. त्यामुळे आम्हाला नावं सांगा, औरंगजेबाचं फोटो नको, सावकरांचे फोटो नको, जयसिंग फोटो नको, अकबर बादशहा फोटो नको या सर्वांची आम्हाला लिस्ट द्यावी. यांचे फोटो दिसल्यास कारवाई करण्याबाबत कायदा आणावा, असे जलील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kolhapur: सोशल मीडियातील अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी, पोलिसांकडून कोल्हापूरवासियांना आवाहन