Maharashtra Cabinet Expansion: शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले आहेत की, येत्या 3 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार.


मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. यातच कोणते जिल्हे ते घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळणार. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती मंत्री मंत्री होणार. ही वाटाघाटी कंदाची झाली असावी. मात्र अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मला असं वाटत पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि 3 तारखेच्या आत (ऑगस्ट महिन्यातील) शपथविधी होईल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते जोर देत म्हणाले आहेत की, 3 तारखेच्या आधी 101 टक्के शपथविधी होईल.   


मागील सरकारमध्ये सत्तार मंत्री होते, ''आताच्या सरकारमध्ये ते मंत्री होणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जे निर्णय घेतात, त्यांना त्यात अनेक अडचणी येतात. त्या अडचणींमधून आम्हाला मंत्री करण्यात त्यांना काही अडचणी येत असेल, तर ते त्या अडचणीप्रमाणे निर्णय घेतील. आम्ही शिंदे यांच्यासोबत कोणत्याही अटी ठेवून आलो नाही.''


31 तारखेला राजीनामा देईन, पुन्हा निवडून येईन: सत्तार 


आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून या असे आव्हान दिले होते. यावर बोलताना सत्तार म्हणाले की, ''मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहे की, मला राजीनामा देण्याची परवानगी द्यावी. 31 तारखेला आमच्याकडे मेळावा आहे. त्यात शिंदेचा सत्कार करणार आहे. त्या दिवशी शिंदे यांची परवानगी घेणार आणि राजीनामा देणार.'' राजीनामा देणार असल्याचे सांगतांनाच मी पुन्हा निवडून येईन, असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे.