Sudhir Mungantiwar : आज हनुमानाचा दिवस होता. विरोधकांनी शपथ घ्यायला हवी होती असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं. उद्या सुट्टीचा दिवस आहे. कामातून सुट्टी मिळावी, यासाठी उद्या विरोधक शपथ घेणार आहेत का? असा सवाल करत मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावला. देव त्यांना सद्बुद्दी देवो असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांनी शपथ घ्यायला हवी होती असे मुनगंटीवार म्हणाले. 


ईव्हीएमच्या मुद्यावरुन मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका


ईव्हीएमच्या मुद्यावरुन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.  नाचता येईना अन् आंगण वाकडं असं म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.ईव्हीएमला जन्म कोणी दिला?  1998  साली तुम्ही कायदा बदलला. ईव्हीएमसंदर्भात तुम्हीच बोलला होता, बॅलेट पेपरवर बुथ कॅप्चरींग होतं, पारदर्शकता राहत नाही. सुप्रिम कोर्टात आव्हान दिलं, मग आता काय झालं? असे सवाल करत मुनगंटीवारांनी विरोधकांचा समाचार घेतला. कर्नाटकात जिंकता, झारखंडमध्ये जिंकले तिथे नाही तुम्ही आक्षेप घेतला असेही मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही राजीनामे द्या मग दबाव तयार होईल असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.


विरोधी आमदारांनी केला सभात्याग 


नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये सत्ताधारी आमदारांनी शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले आणि थेट विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात त्यांना अभिवादन केलं. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील टाच आयकर विभागाने सैल केलीये. अजित पवारांची जप्त करण्यात आलेली मालमत्ता आयकर विभागाने परत केली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेतय याबाबत देखील मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं, यावेळी ते म्हणाले की, अजित पवार मालमत्ता प्रकरणी निर्णय हा आयकर विभागानं घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी देखील क्लिनचिट दिली होती. कोर्ट, इन्कम टॅक्स या यंत्रणा  त्यांचे काम करत असतात. आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी कोर्टात जाऊ दाखवा ना, हिंमत आहे का तुमच्यात? नाही आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


विरोधी पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, नाना पटोलेंचं नाव घेताच सर्व आमदार बाहेर पडले, नेमकं कारण काय?