मुंबई: भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (शुक्रवारी) मुलाखतीवेळी बोलताना आगामी महानगरपालिका निवडणुकीला राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली. भाजपने हात पुढे केल्यास मनसे देखील सोबत येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप मनसे एकत्र येण्यासंदर्भात मनसे देखील सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, भाजपकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यास निश्चित विचार होईल अशी माहिती समोर येत आहे. अशातच आता इतर पक्षांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान मनसे पक्षातून विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेले नेते अखिल चित्रे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून मनसेसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

Continues below advertisement

अखिल चित्रे यांची सोशल मिडिया पोस्ट

अखिल चित्रे यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहून मनसेला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी 'बुलाती है मगर जाने का नहीं, विधानसभा निवडणुकीत प्रेमाने कवेत घेऊन घात केला , आता महापालिका निवडणुकांमध्ये उरली सुरली कसर पूर्ण करण्याचा परत हा कुटील डाव साधला, भाजपाची नितीच बिनशर्त गेम करून मित्रांना संपवायची. देवा तुझा ‘मनसे’ खेळ अजब ‘शिवतीर्थ’ला मित्र बनवून फसवायचा खेळ गजब. #सावधरहा', असं लिहून मनसेला आणि भाजपला लक्ष केलं आहे.

 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला खुल्या दिलाने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाला. पण विधानसभा निवडणुकीत आम्हाला राज ठाकरे यांची अडचण लक्षात आली. त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हाच होता की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आहे. पण त्यांच्या लोकांनी निवडणूक लढवलीच नाही तर तो पक्ष कसा चालणार? आमच्याकडेही त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ती वस्तुस्थिती समजून घेत राज ठाकरे यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढून त्यांना चांगली मतं मिळाली, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिश्य चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.