मुंबई : देशासह महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. महाराष्ट्रात तर प्रचार शिगेला पोहोचला असून सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास घाडीचे (Maha Vikas Aghadi) नेते एकमेकांना भिडले आहेत. हे नेते एकमेकांवर गंभीर स्वरुपाची टीका करताना दिसतायत. अशातच महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून डिवचलं आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो टाकून कितीही येऊदेत, पण आमचा एकटा बॉस नेता पुरेसा आहे, असं सुळे म्हणाल्या आहेत.


प्रचार शिगेला, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप


यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे. कारण या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे दोन गट पडले आहेत. नेते, कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले आहेत. लोकसभेच्या अनेक जागांवर तर राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या दोन्ही गटांत थेट लढत होणार आहे. काहीही झालं तरी आमचाच विजय होणार, असं प्रत्येजकण सांगतोय. सध्याच्या प्रचाराच्या काळात कधीकाळी एकाच पक्षात असलेले नेते एकमेकांवर टीका करताना दिसतायत. खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील यामध्ये मागे नाहीत. त्यांनी शरद पवार यांचे दोन फोटो एकत्र करून विरोधकांना छेडलंय. काहीही झालं तरी आमचे शरद पवार विरोधकांना पुरेसे आहेत, असं सुप्रिया सुळे आपल्या स्टेटसच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत. 


सुळे यांच्या स्टेटसमध्ये नेमकं काय आहे? 


सु्प्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शरद पवार यांचे दोन फोटो एकत्र करून टाकले आहेत. यामध्ये एका फोटोत शरद पवार यांनी हात वर केलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत शरद पवार यांनी कॉलर उडवलेली आहे. पवारांच्या या दोन्ही फोटोंची चांगलीच चर्चा झाली होती.राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचा पुढचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना पवारांनी हात वर करून मी स्वत:च राष्ट्रवादीचा चेहरा आहे, असं सांगितलं होतं. दुसरा फोटो साताऱ्यातील आहे. यावेळीदेखील पत्रकारांनी भाजपचे साताऱ्यातील संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देतांना पवार यांनी थाटात कॉलर उडवली होती. 


किती बी येवू दे समोर त्यांना एकटा बास


याच दोन्ही फोटोंसोबत सुप्रिया सुळेंनी समर्कप असे गाणे जोडले आहे. "किती बी येवू दे समोर त्यांना एकटा बास" असे या गाण्याचे बोल आहेत. म्हणजेच विरोधकांनी कितीही हल्ले करू देत. शरद पवार त्यांना पुरून उरतात, असं सुप्रिया सुळे यांना या स्टेटसच्या माध्यमातून सुचवायचं आहे. त्यांच्या या स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.