सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा (madha loksabha) मतदारसंघात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मिळवल्याने विधानसभा निवडणुकांमध्येही माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी फुंकण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. माढा शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी खराब रस्ते, पडक्या इमारती, घाणीचे ढीग, उघडी गटारे अशा ठिकाणी 'हाच का तीस वर्षाचा विकास' असे भले मोठे फलक लावण्यात आले आहेत. तसेच, हे चित्र बदलायचे आहे, परिवर्तन घडवायचे आहे असा आशय लिहून लावलेले फलक सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. हे फलक अज्ञाताकडून आणि एकाच रात्रीत लावल्याने माढ्याचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, हे फलक कोणी लावले असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, हे फलक विद्यमान आमदार बबन शिंदे (Baban shinde) यांच्या विरोधकांकडून लावण्यात आलंय, हे मात्र निश्चित आहे.
एकेकाळी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवल्याने माढा हा सध्या महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळेच, येथील विधानसभा निवडणुकांवरही राज्यातील बड्या नेत्यांची नजर असते. या ठिकाणी गेले 30 वर्षापासून अजित दादा पवार गटाचे नेते बबन दादा शिंदे हे आमदार आहेत. यावेळी माढ्यातून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी प्रत्येकाचा ओढा हा शरद पवार यांच्या तुतारीकडे आहे. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनीही आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवताना त्याला तुतारी मिळवून देण्यासाठी अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. मात्र सलग तीस वर्ष आमदारकी असणाऱ्या शिंदेंच्या विरोधात नाराजीला तोंड फोडण्यासाठी निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या एखाद्या विरोधकांनी अशा पद्धतीचे फलक माढा शहर व तालुक्यात लावल्याने नागरिकांत व राजकीय वर्तुळातही चर्चेला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा व्हायचे बाकी असले तरी माढ्यात रणजीत शिंदे, अभिजीत पाटील अशा नेत्यांच्या प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्या जवळपास पूर्ण होत आल्या आहेत. आता, अशावेळी रात्रीतून हाच का तीस वर्षाचा विकास असे मोठमोठे फलक लागल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माढा शहर व तालुक्यात ज्या ठिकाणी अत्यंत खराब रस्ते आहेत, पडक्या इमारती आहेत , घाणीचे घाणीचे ढीग दिसतात. तसेच पुरातन निंबाळकरांचा किल्ला ढासळलेला दिसतोय अशा शेजारी हे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाच्या माध्यमातून आमदार बबनदादा शिंदे यांनी गेल्या 30 वर्षात केलेल्या विकासावर प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न या अज्ञात विरोधकांनी केला आहे. त्यामुळे शिंदे समर्थक कार्यकर्ते मात्र आक्रमक बनू लागले आहेत. मतदारसंघात आता या फलकावरून नव्या राजकारणाला सुरुवात होणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, हा डिजिटलचा उद्योग नेमका कोणी केला, याचीच खमंग चर्चा सध्या माढा तालुक्यात सुरू आहे. तर, या डिजिटलवाल्याचा शोधही घेतला जात आहे.
हेही वाचा
पोलिसांकडून बेड्या, किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण?, रिलस्टार, युट्युबवर फेमस