नांदेड: गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात बहुप्रतीक्षित असलेली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर असा सामना रंगताना दिसेल. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा झाल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्याचे आव्हान कशाप्रकारे पेलणार, हे आता पाहावे लागेल.


कोण आहेत वसंतराव चव्हाण ?


वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. 'राष्ट्रवादी'ने त्यांना 2002 साली विधान परिषदेवर नियुक्त केले, पण 2009 मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2014 साली दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चव्हाण यांचा 2019 मध्ये भाजपाकडून पराभव झाला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला होता.


नांदेडमध्ये 100 टक्के काँग्रेसचा विजय होईल, वसंतराव चव्हाणांची गॅरंटी


मी आभारी आहे. मी नांदेडमधून काँग्रेस कमिटीकडून विनंती केली होती. प्रदेश काँग्रेसने मला उमेदवारी दिली, यासाठी मी आभारी आहे. नांदेडमध्ये मी सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवेन. जरी आमचे जिल्ह्याचे नेते भाजपमध्ये गेले असले तरी सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या पाठिशी आहे. नांदेड लोकसभेची जागा 100 टक्के नि़वडून येईल. आज राज्यात शेतकरी आणि सामान्य माणूस हवालदिल झाला आहे, असे वसंतराव चव्हाण यांनी म्हटले. सत्तेवर आल्यानंतर आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ. नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये कोणताही उद्योग आला नाही, त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. शेतकऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत. माझ्यासमोर भाजपचा जो उमेदवार असेल त्यांचा लोकांशी संपर्क कमी झालेला आहे. त्या माणसाने नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज आहेत, असेही वसंतराव चव्हाण यांनी म्हटले. अशोक  चव्हाण साहेब पक्ष सोडून गेले असले तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. याचा मला फायदा मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत वंचितने नांदेड मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर मतं मिळाली होती. पण यंदा तशी परिस्थिती नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. 



काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे:


नंदुरबार - ॲड. गोवाल पाडवी 
अमरावती - बळवंत वानखडे 
नांदेड - वसंतराव चव्हाण 
पुणे - रवींद्र धंगेकर
लातूर - डॉ. शिवाजीराव कळगे 
सोलापूर - प्रणिती शिंदे
कोल्हापूर - शाहू शहाजी छत्रपती


आणखी वाचा


काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात