मुंबई: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर मंगळवारी रात्री भाजपच्या गोटातून महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची (BJP candidate list) यादी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करताना भाजप नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने (BJP) लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपच्या 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक बड्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव का नाही, असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला होता. पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने भाजप त्यांचा पत्ता कापणार का, अशी चर्चाही सुरु झाली होती.
भाजपच्या महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांच्या यादीत नागपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. यादीत नमूद केल्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनाच पुन्हा संधी दिली जाईल. त्यामुळे गडकरी समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपकडून राज्याचे वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, सातत्याने चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातूनही विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील इच्छूक होते. परंतु, भाजप नेतृत्त्वाने रणजितसिंह निंबाळकर यांच्याच पारड्यात दान टाकले आहे.
भाजपच्या संभाव्य 32 लोकसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
1. पुणे : मुरलीधर मोहोळ
2. धुळे : सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
3. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.
4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता.
6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
8. अकोला : संजय धोत्रे
9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक
10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
13. बीड : विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे
14. माढा - रणजितसिंह निंबाळकर
15. गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.
16. भिवंडी : कपिल पाटील
17. सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.
18. सातारा : उदयनराजे भोसले
19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.
20. दिंडोरी : भारती पवार
21. रावेर : अमोल जावळे
22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय)
23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.
26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपा घेण्यास आग्रही आहे )
27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत )
28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
29. नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली )
30 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र, ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकीटावर लढतील अशी शक्यता आहे.
31. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
32. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.