मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बोचरी टाकी केली आहे. एका हिंदी गाण्याचे विडंबन करताना त्याने एकनाथ शिंदें याच्याशी साधर्म्य साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टीका केल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून ज्या स्टुडिओत कुणाल कामराने हे गाणं गायलं त्या स्टुडिओतही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. आता, या कुणाल कामराच्या गाण्याचा आणि टीकेचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत असून विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांकडून कुणाला कामरावर कारवाईची मागणी होत आहे. तर, विरोधकांकडून कुणाल कामराची पाठराखण करत तोडफोडीविरुद्ध कारवाईची मागणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामाराचे वक्तव्य चुकीचे असून त्याने माफी मागावी, असे म्हटले. आता, मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनीही (Aaditya Thackeray) कुणाल कामराच्या व्हायरल व्हिडिओचे समर्थन केलं आहे. या व्हिडिओत कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलेलं नाही, असेही आदित्य यांनी म्हटले.    

Continues below advertisement

मी कुणाल कामराचा पूर्ण व्हिडिओ बघितलास, त्याची कविता बघितली मात्र त्याच्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं का की त्यांचं नाव गद्दार आहे, त्यांना मिरची का झोंबली? असा खोचक टोला शिवसेना उबाठाचे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. मी त्यांच्या खासदारांची प्रतिक्रिया मी ऐकली ते आपल्या नेत्याला साप म्हणतात, एकनाथ शिंदे यांना साप म्हणणारे ते खासदार आहेत असे म्हणत नरेश म्हस्केंवर हल्लाबोल केला. दोन्ही बाजूने विचार केला तर कोण चूक आणि कोण बरोबर याची चौकशी होईल. पण जर नाव न घेता मिरची झोंबत असेल तर त्यांनी स्वतःला ते नाव दिलं आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. 

कामराने कोणाची माफी मागायची?

तो कार्यक्रम कधीही होऊ द्या, त्या कार्यक्रमांमध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत असतील कामराने माफी मागितली पाहिजे. पण माफी कोणाची मागायची, गद्दारांची? कारण त्यात फक्त गद्दार नाव घेतला आहे, बाकी कोणाचं नाव घेतलेलं नाही, असे म्हणत ठाकरेंनी कुणाल कामरा प्रकरणावरुन मुख्यमंत्र्‍यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे.   

Continues below advertisement

भाजपने रंगांचा खेळ बंद करावा

कामराने हाती लाल रंगाचे संविधान असलेला फोटो शेअर केला आहे. त्यासंदर्भात बोलताना संविधान लाल आणि कोणत्या रंगाचे? या रंगांचा खेळ भाजपने बंद करावा, असे आदित्य यांनी म्हटले. रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या घोटाळ्यासंदर्भात आज बैठक आहे, त्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. मी सगळ्यात आधीपासून मागणी केली आहे की या रस्त्यांच्या कामामध्ये घोटाळा झाला आहे, आणि त्याची युओडब्लूकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही आदित्य यांनी केली आहे.

हेही वाचा

पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ