सातारा : वेदना झाली की आई असा शब्द आपसूकच प्रत्येकाच्या तोंडातून निघतो. तीच आई (Mother) आपल्या बाळासाठी रात्रीचा दिवस, आणि दिवसाची रात्र करून आपल्या मुलांना सांभाळत असते. म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आपल्या लेकरासाठी जीवाचं रान करणारी आई प्रत्येक गावात, शहरात, बांधकाम साईटवर किंवा मोठ मोठ्या प्रकल्पांवरील कामावर पाहायला मिळते. लेकरासाठी ऊन, पाऊस, वारा झेलत कर्तव्य बजावणारी, आभाळमाया म्हणजे आई. आईच्या प्रेमाची कित्येक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. मात्र, आता याची प्रचिती आणणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्याच्या (Satara) महाबळेश्वरमधील दानवली या दुर्गम खेडेगावातील गावातील हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये, आईने आपल्या 3 वर्षांच्या लेकराला चक्क दगडाला बांधून ठेवल्याचं दिसून येते. कारण, आईला उन्हातानात काम करावं लागतंय, तेव्हा लेकरू कुठेही जाऊ नये म्हणून आईने पोटचा गोळा दगडाला बांधून ठेवल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आलीय.
अवघ्या तीन वर्षाचं लहान लेकरू कडक उन्हात दगडामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. तीन वर्षाचं लेकरू उन्हामध्ये बांधून आई परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्ट करत आहे. पाठीवर बाळ घेऊन युद्ध लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्याचबरोबर रायगडावरून अंधाऱ्या रात्रीत खाली उतरणारी हिरकणी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे, साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये आपल्याला पाहायला मिळणारी ही आई त्या हिरकणीपेक्षा कमी नाही. मोलमजुरी करून आपला संसार सावरणारे व्हिडिओतील हे कुटुंब पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय.
विशेष म्हणजे या मजूर आईचा मुलगा 3 वर्षांचा झाला तरी त्या मुलाला बोलता येत नाही. ज्यावेळी आईला विचारलं त्यावेळी आईचे उत्तर हृदय हलवून टाकणार होतं, ते म्हणजे पैसे नाहीत. त्यामुळे, मुलावर ना कुठले उपचार ना कुठला दवाखाना. काम करत असताना आपल्या नजरेपासून लांब आपलं लेकरू जाऊ नये यासाठी आपल्या लेकराच्या पायाला दगड बांधून काम करण्याची वेळ या आईवर आल्याचे पाहायला मिळते. पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून ही मजूर महिला काम करत आहे. तीन वर्षाचं लेकरू होऊन सुद्धा त्याला बोलता येत नाही. त्याच काळजीने मुलगा इतरत्र जाऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आईनं केलेलं हे अमानवी कृत्यही मायेच्या निस्सीम प्रेमाचं उदाहरण आहे.
एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी
दरम्यान, परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेचं आणि तिच्या लेकराचं भयान वास्तव्य युट्युबवरुन व्हायरल झालं आहे.शितल दानवले यांनी ब्रँड शेतकरी या यूट्यूब चैनलवर ही भयान परिस्थिती दाखवत हे आपल्या देशाचं भवितव्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच, शितल यांनी शासनाकडे या चिमुकल्यास वैद्यकीय मदत मिळावी असं आव्हान देखील केलं. दरम्यान, याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून मुलावरील उपचाराचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा