Kiran Mane on Udayanraje Bhosale : ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. किरण मानेंनी आज (दि.22)थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. "स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे",असं किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


किरण मानेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलय?


किरण माने पोस्टमध्ये लिहितात,  माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं....हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल... तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली.






हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान 


जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत...कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही ! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे 'पपेट' होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा.


'जय गुजरात' अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही


मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच 'जय गुजरात' अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत.
वेळीच जागे व्हा.


किरण मानेंच्या जुन्या पोस्टचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख 


किरण मानेंच्या पोस्टला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काही जणांनी समर्थन देखील केले आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द उद्धव ठाकरेंनी भर सभेत किरण मानेंच्या पोस्टचा उल्लेख केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar on Majha Katta : औरंगाबादचा जलील पॅटर्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होणार? प्रकाश आंबेडकर माझा कट्टावर काय म्हणाले?