मुंबई : कल्याणमध्ये (Kalyan) अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) या सरकारी अधिकाऱ्याने 10 ते 15 गुंडांना बोलावून एका मराठी कुटुंबाला मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2024) देखील उमटल्याचे दिसून आले. तर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी कल्याणच्या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय.
काय म्हणाले केदार दिघे?
केदार दिघे यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट करून सत्ताधारांवर निशाणा साधलाय. शुक्ला नावाच्या माणसाने मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण केली... एक है तो सेफ है कुठं आहे? मराठी माणसा लक्षात ठेव आता तरी "एक हो", सत्ताधारी उत्तर द्या, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या सोसायटीत एमटीडीसीमध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे शेजारी आहेत. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता नेहमी या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो आणि हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला त्रास व्हायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने शुक्ला याने 10 ते 15 गुंडांना बोलावून लोखंडी रॉडने देशमुख बंधूंना बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अखिलेश शुक्ला याच्यासह दोन जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आणखी वाचा