मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी घरी भेट दिली. या भेटीत त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रीय पोशाख परिधान केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या भेटीचे व्हिडीओ समोर आले होते. हे व्हिडीओ समोर आल्यानंतर या भेटीबद्दल विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले.  अनेकांनी या भेटीवर आणि त्याच्या टायमिंगवर देखील प्रश्न उपस्थित केले. राजकीय पक्षांनी देखील या भेटीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती केली होती.  विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते विनोद तावडे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे एका कार्यक्रमातील फोटो शेअर करत हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आणखी काही फोटो शेअर करत भाजपला उत्तर दिलं आहे.

  


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या मोहिमेला उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या कार्यक्रमात आणखी कोण कोण सहभागी झालं होतं, याची माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी थेट फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये भाजपचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, सीताराम येच्युरी, लालू प्रसाद यादव, राहुल गांधी देखील त्या फोटोत दिसत आहेत. या द्वारे जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांची भेट ही घरगुती नव्हती तो ती सार्वजनिक कार्यक्रमातील होती, हे स्पष्ट केलं आहे.


 जितेंद्र आव्हाड ट्विट जसंच्या तसं 


सध्या तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो वायरल होत आहेत. ते फोटो यासाठी वायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारक नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि तत्कालीन डाॅ. मनमोहन सिंग हे एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेले दिसतात. त्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राहुल गांधी, सीताराम येच्युरी असे अनेक नेते आजूबाजूला दिसतात. म्हणजेच हा एक सार्वजनिक कार्यक्रम असावा; ज्यामध्ये देशातील प्रमुख नेते आणि व्यक्तींना बोलावले गेलेले असेल. ही एकांतात किंवा घरात झालेली भेट नसून एका प्रांगणात झालेली भेट, असेच या भेटीचे वर्णन करता येईल. तेव्हा झालेल्या चुकीचे असे लंगडं समर्थन करू नका.






इतर बातम्या :