मुंबई : भाजपमधील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यापूर्वीच त्यांचा मुलगा आणि कन्या या दोघांनीही तुतारीचं स्टेटस ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर, आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली. मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाची तारीख ठरली नव्हती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केलं आहे. तसेच, त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या तारखेवरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, या निर्णयानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेवरच आता काहींनी प्रश्न उपस्थित केल्याचंही पाहायला मिळालं. 


हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. तसेच, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय. माझ प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. 


''राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल,'' अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली. 


पक्षप्रवेशाविरुद्ध इंदापुरात झळकले बॅनर


पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला, तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झालेले आहे, असा आशयाचा बॅनर झळकला आहे. इंदापुरातील दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता अशा प्रकारचे सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर आव्हाने निर्माण करण्यात येत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे, इंदापूरचं राजकारण सध्या राज्यभर चर्चेत आहे. 


हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध


इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. 


हेही वाचा


तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे