Jayant Patil Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तातडीने सांगलीतून मुंबईकडे धाव घेतली. "मी इथे जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे. त्यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे," असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही. मी का बोलतोय मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे कारण ते तिथे होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही? असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
जयंत पाटील म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असे म्हटले. त्यांची समजूत काढण्यासाठी मी आलोय. मी प्रवासात असताना आणि येथे आल्यावर काही माहिती या सगळया बद्दल घेतली. ज्या भगिनीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या क्लिप सगळीकडे आहेत. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात त्याच महिलेला भगिनी म्हणून संबोधतात तो व्हिडीओ बघा."
राज्य सरकारला सवाल
याच भगिनी जेव्हा मुख्यमंत्री यांच्या गाडीकडे येतात तेव्हा जितेंद्र आव्हाड बाजूला जाण्यासाठी या महिलेला सांगतात. एवढं भाष्य करून ते पुढे निघून जातात. यापेक्षा वेगळं काही नव्हतं. तरी गुन्हा दाखल होतो, हे आश्चर्य वाटतं. कलम 354 म्हणजे स्त्रीला लज्जा उत्पन्न करणे , विनयभंग करणे, कामुक भावनेने बोलणे याला सुद्धा विनयभंग म्हणता येईल. माझा राज्य सरकारला आणि पोलिसांना प्रश्न आहे काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते?, असे सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्री घटनास्थळीच होते
हे प्रकरण 354 मध्ये कसं बसवलं? जाणीवपूर्वक मुद्दामहून अडकवलं जात असेल तर कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होतात. उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याची दखल घेतली का हे माहीत नाही. मुख्यमंत्री तर त्या घटनास्थळी होते.
मुख्यमंत्री त्या महिलेला भेटल्याचे फोटो
हरहर महादेवाला जर जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला तर त्यांची काय चूक? या प्रकरणात ओढूनताणून दुसरं कलम लावलं त्यात सुद्धा जामीन मिळाला. यावरच मग मुद्दामहून जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला, असं दिसतंय. या घटनेनंतर मुख्यमंत्री हे या महिलेला भेटले, याचे फोटोज सुद्धा आहे.
मुख्यमंत्र्याच्या विवेकबुद्धीला हे सगळं पटतं का?
राज्यात पोलीस एखाद्या प्याद्याप्रमाणे वागत आहेत. महाराष्ट्र सरकारला जाब विचारु, पोलिसांना सुद्धा विचारु, असा पवित्रा जयंत पाटील यांनी घेतला. माझं मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी का बोलतोय मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे कारण ते तिथे होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही? पोलिसांनी न्यायबुद्धीने वागलं पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या विवेकबुद्धीला हे सगळं पटतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.