Jain Temple Vile Parle: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरातील एका जैन मंदिरावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्यात आले होते. हे मंदिर अनधिकृत असल्याचे कारण पुढे करत पालिकेने सर्वांसाठी समान न्याय या निकषाने संबंधित मंदिराचे (Jain Temple) अनधिकृत बांधकाम तोडले होते. मात्र, त्यानंतर विलेपार्ले (VileParle) परिसरात जैन समाज एकटवल्याने मंदिरावर कारवाईचा आदेश देणारे मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सहायक आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांच्यावर कारवाई झाली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून टीकेची तोफ डागण्यात आली आहे.
शिंदे व त्यांचे लोक हे मोदी-शहांचे मिंधे आहेत. फडणवीस यांच्या महाराष्ट्रप्रेमाचे ढोंग वारंवार उघडे पडले आहे. मुंबई या लोकांनी विकायला काढली व महाराष्ट्र लुटीचे 'टेंडर' काढले ते अमराठी ठेकेदारांना दिले. धारावीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात असताना मराठी माणूस मुंबईचा हा विस्कोट उघड्या डोळ्याने, एका हतबलतेने पाहत आहे. मुंबईत इतर समाज संकटकाळी एकवटून कडवटपणाने उभा राहतो, परंतु हाच एकजुटीचा मराठी बाणा आज खिळखिळा झाला आहे. विलेपार्ले हा एकेकाळी मराठी संस्कृतीचा अभेद्य गड, परंतु परवा तेथील एका जैन देरासरवर महापालिकेची कारवाई होताच काही क्षणांत हजारो जैन बांधव एकवटले व त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून पालिकेच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करायला भाग पाडले. मुंबईत इतर जातीय व धर्मीय बांधव एकजुटीने राहतात आणि भाजपसारख्या व्यापारी वृत्तीच्या पक्षांना पाठबळ देतात. हे महाराष्ट्राच्या पर्यायाने मराठी माणसांच्या मुळावर येणारे आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. भाजपचे राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, असा विचार 'सामना'तून मांडण्यात आला आहे.
विलेपार्ल्यात कारवाईनंतर जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा
पालिकेने विलेपार्ले येथील मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. त्यामुळे आता महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी पाडकाम करण्यात आलेल्या जागी पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली आहे. या मंदिराच्या पाडकामानंतर 60 टक्के राडारोडा काढण्यात आला आहे. आणखी 40 टक्के मलबा याठिकाणी पडून आहे. याठिकाणी जैन समाजाचे उपासक, तरुण आणि महिला सध्या 'पहारा' देत आहेत. पालिकेच्या के पूर्व विभागाने तब्बल 200 पोलिसांचा फौजफाटा घेऊन एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरुन जैन मंदिरावर कारवाई केली. एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरुन सहायक आयुक्त नवनाथ घाडगे यांनी जैन मंदिरावर कारवाई केल्याचा आरोप जैन मंदिराचे सचिव अनिल बंडी यांनी केला. हे जैन मंदिर 90 वर्षे जुने आहे. पालिकेने या मंदिराचे पुनर्वसन करुन द्यावे अथवा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी 'वॉच डॉग' या सामाजिक संस्थेने केली आहे.
आणखी वाचा
विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी, महापालिका आयुक्तांचे आदेश