नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला असून राज्यात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते महिला भगिनींशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेथेही निवडणुकीच्या मैदानात उतरला असून राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संसदीय मंडळाने पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसूफ हजम, पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी (Vidhansabha) घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे इतर कुठल्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवत आहे, असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे इतर उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले
25 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा (Vidhansabha) निवडणुक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 25 स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या 25 प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे