Rahul Gandhi On PM Modi: देशातील वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, "भारतीय रुपया 77.47 प्रति डॉलरच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.'' महागाईवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 100 रुपयांनी आणि एलपीजीच्या किमती 1000 रुपयांपेक्षा अधिक वाढवण्याचे आपले लक्ष पूर्ण केले आहे. 


देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “आर्थिकदृष्ट्या भारत सध्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. हे असेच सुरू राहिले तर पुढे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे भारतीयांना गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.” या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर देशाची आर्थिक स्थिती लोकांपासून लपवल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत राहुल यांनी लिहिले की, पंतप्रधान देशाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक सत्य कायम लपवू शकत नाहीत.


आर्थिक आघाडीवर देशाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सल्लाही दिला आहे. राहुल यांनी लिहिलं आहे की, "आता वेळ आली आहे की, पंतप्रधानांना आपली पीआर ऑफर इकडे-तिकडे देण्या ऐवजी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घ्यावी आणि ती सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी."


दरम्यान, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता सिलेंडरच्या किंमती 1000 रुपये पार झाल्या आहेत. तर देशभरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलसाठी 120 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहे. यामुळे जनतेत नाराजी आहे. अशातच एलपीजी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होणार, असा सवाल राजकीय पक्ष आणि जनतेकडून विचारण्यात येत आहे.