बारामती: राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणी आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये नोंदवला होता. तपास यंत्रणेनुसार, शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने सहकारी साखर कारखाना त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी व्यक्तींना अतिशय कमी दरात विकला होता. आता ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत यावरती सविस्तरपणे भाष्य केलं आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात लढाई लढणार आहे. सेशन कोर्टापासून, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई लढणार आहे. आम्ही पळून जाणार नाही, आम्ही लाचार होणार नाही, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
18 तारखेनंतर आमचा लढा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल
ईडीने केलेल्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हतं. 97 लोकांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते. मात्र, मुद्दाम माझे नाव घेण्यात आले. माझी ईडीकडून अनेक वेळा 12 तास चौकशी करण्यात आली. मी न्यायालयात लढाई लढणार आहे. सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणार आहे. आम्ही पळून जाणार नाही. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही. महाराष्ट्राच्या माणसाने लाचारी स्वीकारली नाही. कारखान्याची एक एकर जमीन मी विकली नाही. अधिवेशनात मी एकटाच सरकार विरोधात बोलत आहे. 18 तारखेनंतर आमचा लढा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल, एमएसी बॅंककडून कधीची कर्ज घेतलेले आहे, तर 2012मधील आहे, त्यासाठी हे आरोपपत्र दखल केलं होते. एका कारखान्यासाठी कर्ज घेतले होते, 2009 ला कन्नड सहकारी साखर कारखाना आहे पाहिल्यादा टेंडर काढले. एमएसी बॅंकने आर्थिक तफावत असल्याचा रिपोर्ट नाबार्डला 2011ला दिला. तिसऱ्यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर आम्ही बारामती ॲग्रोने हा कारखाना घेतला, अशी माहिती रोहित पवारांनी यावेळी दिली आहे.
यात मुद्दाम माझं नाव घेतलं गेलं
100 लोकांची नावे नाबार्डने घेतली होती. ईडीने दाखल केला आहे त्या एफआयआरमध्ये 97 लोकांची नावे आहेत. मात्र त्यावेळी यात माझे नाव नव्हते. 97 लोकांचे नाव बाजूला ठेवून माझा एकट्यावर कारवाई करण्याचे राजकीय दृष्टिकोनातून झाला. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आहे. यात मुद्दाम माझं नाव घेतलं गेलं आहे, असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
तो कारखाना माझा आहे मी चालवतो त्यात कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. माझी बारा बारा तास चौकशी करण्यात आली. आरोप पत्र दाखल झालं. यामध्ये काही सापडलं नाही. आम्हाला आता कोर्टात जाऊन न्याय मागवा लागेल. कुठेही आणि चुका केल्या नाहीत कुठेही चुकीचं काही केलं नाही, त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल. सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि ही लढाई मी जिंकणार आहे, मी कुठेही काही चुकीचं केलं नाही. आम्ही घाबरणारी पळणारी लोक नाही, आम्ही लढणारी लोक आहोत. आम्ही मराठी माणसं आहोत, दिल्लीसमोर आम्ह कधीही झुकत नाही. अनेक लोक पळून गेले, लाचारी स्वीकारली आम्ही तसे करणार नाही. 97 लोकांमधील काही लोक भाजपमध्ये काही अजितदादांकडे काही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मी एकटा ईडी विरोधात लढत आहे, मी लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.