Survey On Loksabha Election 2024: आज लोकसभेची निवडणूक झाली तर देशात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. पण नितीश कुमार यांच्यासोबतची युती तुटण्याचा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.


सर्वेक्षणानुसार 1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला 543 जागांपैकी 307 जागा मिळतील. तर यूपीएला 125 जागा आणि इतर पक्षांना 111 जागा मिळतील, असं सांगण्यात आले आहे. पण बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला थेट 21 जागा कमी मिळाल्या असत्या. बिहारमध्ये झालेल्या सत्ता बदलानंतर एनडीएला 286 जागा मिळाल्या असत्या. तर यूपीएला 146 जागा आणि इतर पक्षांना 111 जागा मिळाल्या असत्या. इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटरने फेब्रुवारी 2022 ते 9 ऑगस्ट 2022 दरम्यान हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 122016 लोकांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणाची तारीख 9 ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. कारण या दिवशी नितीश कुमार भाजपसोबतची युती तोडणार हे निश्चित झाले होते.

एनडीएची मतांची टक्केवारी 41.4 टक्के असेल


या सर्वेक्षणानुसार, आज निवडणुका झाल्या तर एनडीएला 41.4 टक्के मते मिळतील. तर यूपीएला 28.1 टक्के आणि इतर पक्षांना 30.6 टक्के मते मिळतील. म्हणजेच यावेळीही एनडीएला यूपीएपेक्षा 13.3 टक्के जास्त मते मिळतील.


पंतप्रधानपदासाठी पुन्हा मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब 


सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल, तर 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. सर्वेक्षणात राहुल गांधी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. 9 टक्के लोकांनी त्यांना मतदान केले आहे. तसेच या सर्वेक्षणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मागे टाकले आहे. केजरीवाल यांना 6 टक्के तर योगी यांना 5 टक्के आणि शहा यांना 3 टक्के मते मिळाली आहेत.


28.1 टक्के लोकांनी एनडीए सरकारचे काम चांगले असल्याचे सांगितले


सर्वेक्षणात 28.1 टक्के लोकांनी एनडीए सरकारचे काम चांगले असल्याचे सांगितले. तर 23.7 टक्के लोकांनी एनडीए सरकारचे काम खूप वाईट असल्याचे सांगितले. 


ईडी-सीबीआयचा गैरवापर होत असल्याचे 38% लोकांनी मान्य केले


सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा गैरवापर करते का? यावर 38 टक्के लोकांनी होय आणि 41 टक्के नाही असे उत्तर दिले.