Yakub Memon Grave Controversy News : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरण केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवताच यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. आता यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज ठाकरेंनी आदेश दिला तर याकूब मेमनची कबर उद्ध्वस्त करू, असा इशारा मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे. 


यावेळी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचा जनाजा थाटात निघाला. पुढे दफनविधीही झाला आणि काही दिवसांनी लोक विसरून गेले. दरम्यान हळूहळू त्याचा उदात्तीकरण व्हायला सुरुवात झाली. नशीब म्हणजे की लवकर लक्षात आलं, अन्यथा काही दिवसांनी तिथे उरूस भरला असता. त्यामुळे वेळ पडली तर कबरीचे दगडं सुद्धा काढून फेकण्याची तयारी करावी लागेल. हिंदूंना तेव्हाच हा आतंकवाद कुठेतरी थांबवता येईल आणि त्यांना लगाम बसेल.


अन्यथा मेमनची कबर उद्ध्वस्त करू...


पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, आज कुठे आहे संभाजी ब्रिगेड, कुठे आहे शिवसंग्राम, कुठे आहे शिवसेना?, शिवसेनेने तर  दसरा मेळावा घेण्याची गरज नाही. कारण हिंदुत्वापासून शिवसेना फार दूर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला वाटते की, अशाप्रकारे अतिरेक्यांचं उदात्तीकरण बंद झाले पाहिजे. सगळा वफ्फ बोर्ड सरकारने ताब्यात घेऊन ती कबर जमीनदोस्त केली पाहिजे. सरकार जर ती कबर जमीनदोस्त करणार नसतील तर राज ठाकरे यांची आज्ञा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक तिथे जाऊन ती कबर उद्ध्वस्त करेल,असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे. अशाप्रकारे अतिरिक्याचं उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही,असेही ते म्हणाले.


शिवसेना-भाजपने अधिकार गमावला आहे


भाजपने शिवसेनेवर टीका करावी आणि शिवसेनेने भाजपवर टीका करावी मात्र 2015 ला तर हे सर्व एकत्र होते. त्यावेळी हे काय चाललंय, त्यांच्या लक्षात कसं आलं नाही. भाजपला काय अधिकार आहे, ज्यांनी नुपूर शर्माशी अंतर ठेवलं. त्यांना हिंदूंवर बोलण्याचा काय अधिकार आहे. तर शिवसेनेने अधिकार गमावला आहे. ज्या दिवशी सत्तेसाठी शिवसेना शरण गेली, असल्याचं महाजन म्हणाले.       


संबंधित बातमी: 


चार्टर्ड अकाउंट ते मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार, ज्याची कबर सजवली तो दहशतवादी याकूब मेमन कोण?