Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, आता गुगुल मॅपवर (Google Map) औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.  गुगुल मॅपवर औरंगाबाद शोधले असता मराठीत औरंगाबाद तर इंग्रजीत 'संभाजीनगर' (Sambhaji Nagar) असा उल्लेख दाखवत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्यावरून वाद पेटला असतांना आता गूगलच्या 'संभाजीनगर'च्या उल्लेखाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


गेली 34 वर्षे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. या काळात अनेक आंदोलने झाली, प्रकरण न्यायालयात गेले, एवढ्या दिवसांच्या संघर्षानंतर अखेर राज्य सरकराने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनतर सुद्धा नामांतराला विरोध सुरुच आहे. याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. मात्र त्यापूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेकडून संभाजीनगर म्हणूनच उल्लेख...


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली औरंगाबादच्या सभेत शहराच्या नावाची संभाजीनगर म्हणून पहिल्यांदा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेनेकडून शहराचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनच केला जातो. अनेकदा शिवसेना मंत्राच्या शासकीय कार्यक्रमात सुद्धा संभाजीनगर म्हणूनच उल्लेख केला गेल्याचे सुद्धा समोर आले होते. 


एमआयएमचा विरोध...


औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली आहे . मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत शहराचे नाव बदलू देणार नसल्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आणि काही संघटनांनी मोर्चा सुद्धा काढला होता. त्यामुळे आता गूगल मॅपवर झालेल्या बदल पाहता पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र...


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराच्या निर्णयाला परवानगी दिली असतांना सत्तेत सोबत असलेल्या काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला नव्हता. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यांनतर यासंबंधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे सुद्धा नाराज पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती.