Kashmiri Pandit Rehabilitation: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर किती काश्मिरी पंडित राज्यात परतले आणि लोकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारकडून संसदेत माहिती देण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 4 काश्मिरी पंडितांसह 14 हिंदूंचा मृत्यू झाला आहे. तर 2105 लोक नोकरीसाठी स्थलांतरित झाले आहेत.


दहशतवादी हल्ल्यांची दिली माहिती 


केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, कलम 370 रद्द केल्यापासून 2020-21 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये 841 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2021-22 मध्ये 1264 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे पंतप्रधान विकास पॅकेज अंतर्गत देण्यात आलेल्या नोकऱ्यांसाठी एकूण 2105 स्थलांतरित खोऱ्यात परतले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, ज्यांना काश्मीरमध्ये जायचे आहे, त्यांच्यासाठी तेथे घरे बांधली जात आहेत. नित्यानंद राय म्हणाले की 5 ऑगस्ट 2019 ते 24 मार्च 2022 रोजी कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 4 काश्मिरी पंडित आणि 10 हिंदूंसह एकूण 14 लोक मारले गेले आहेत. याशिवाय दहशतवादी घटनांमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितलं की, मे 2014 ते ऑगस्ट 2019 पर्यंत 170 नागरिक आणि 406 सुरक्षा कर्मचारी दहशतवादी घटनांना बळी पडले आहेत. तसेच ऑगस्ट 2019 पर्यंत म्हणजेच कलम 370 रद्द करण्यापासून ते नोव्हेंबर 2021 पर्यंत दहशतवादी घटनांमध्ये 87 नागरिक आणि 99 सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत.


3000 नोकऱ्या निर्माण झाल्या


केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान विकास पॅकेज 2015 (PMDP-2015) अंतर्गत काश्मिरी स्थलांतरितांसाठी 3000 राज्य सरकारी नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. 2828 स्थलांतरितांच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी 1913 स्थलांतरितांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित 915 जणांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. राज्यसभेत दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की केंद्र सरकार काश्मिरी स्थलांतरितांसाठी प्रति कुटुंब प्रति महिना 13000 रुपयांची मदत देखील देण्यात येत आहे