नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीसीएस म्हणजेच कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर, आज बिहार दौऱ्यावर असलेल्या मोदींनी थेट येथील सभेला संबोधित करताना पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. उनकी बची-कुची जमिन को अब मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी भारत गप्प बसणार नसल्याचे म्हटले. दुसरीकडे याच अनुषंगाने केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisee) यांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी फोन करुन दिल्लीला बोलावलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, हा कट रचणाऱ्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार असल्याचेही मोदींनी ठणकावले आहे. तसेच, उनकी बची-कुची जमिन को अब मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है.. असेही मोदींनी म्हटले. दरम्यान, केंद्र सरकारने आज महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली असून राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात असून सरकारकडून गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावरुन विविध पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने अमित शाह यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना स्वत: फोन करुन दिल्लीत बैठकीला येण्याचे आवाहन केले आहे. खासदार ओवैसी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून पहलगाम हल्ला हा महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मला फोन करुन विचारलं, तुम्ही कुठं आहात, लगेच दिल्लीला या, असे ओवैसी यांनी सांगितले. तसेच, मी आता तिकीट बुक केलं असून तातडीने दिल्लीला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी अगोदर एमआयएमला बोलवले नव्हते, त्यानंतर ओवैसींनी केंद्रीयमंत्री किरण रिजीजू यांना फोनवरुन संपर्क साधला. तसेच, मोदींनी या बैठकीसाठी मलाही निंमत्रण द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर, आता अमित शाह यांनी फोन करुन या बैठकीचं निमंत्रण असदुद्दीन ओवैसींना दिलं आहे.
सीसीएस बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानविरोधात 5 तकडे निर्णय घेण्यात आले.
पाकिस्तानविरुद्ध 5 तगडे निर्णय
सिंधु पाणी करार स्थगित पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद