Hasan Mushrif Profile : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED raid) यांच्या कोल्हापुरातील कागल (Kagal) आणि पुण्यातील (Pune) घरांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी केली. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने आपलं धाडसत्र सुरु केलं. या धाडसत्राची माहिती मिळाल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली. 


दरम्यान, या धाडसत्रानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला. "हसन मुश्रीफांनी 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला. उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एक माफिया मंत्र्यावर कारवाई होणार आहे. कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मातेने आज मला आशीर्वाद दिला. कोल्हापूरला जायला निघालो असताना उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मला जाऊ दिलं नाही. आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला" असं किरीट सोमय्या म्हणाले. 


मुश्रीफांचं काऊंटडाऊन 


दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. हसन मियां यांच्यावर कारवाई होणार. हसन मुश्रीफ का एवढी घाई करत आहेत. पहिला नंबर अनिल परब, नंतर मुश्रीफ आणि मग अस्लम शेख यांचा लागणार आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. 


कोण आहेत हसन मुश्रीफ? (Who is Hasan Mushrif)



  • हसन मुश्रीफ हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत

  • कागल हा कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचा मतदारसंघ आहे

  • 1999, 2004, 2009,2014 आणि 2019 अशा सलग 5 निवडणुका त्यांनी जिंकल्या

  • ठाकरे सरकारच्या काळात हसन मुश्रीफ ग्राम विकास मंत्री होते

  • शरद पवार यांच्या जवळचे आणि एकनिष्ठ नेते म्हणून ओळख आहे

  • राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडा मुस्लिम चेहरा

  • शरद पवारांच्या टीकाकारांना उत्तर देणारा पहिल्या फळीतील नेता


किरीट सोमय्या यांचे नेमके आरोप काय?


बोगस कंपन्यांद्वारे साखर कारखाना चालवण्याचे कंत्राट घेऊन 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुख्य आरोप सोमय्यांनी मुश्रीफांवर केला आहे. 


2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. 


सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.


संबंधित बातमी