कोल्हापूर : महायुतीमध्ये अनेक जागांवरुन संघर्षाची ठिणगी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, कालच चिंचवडमधील जागा आपल्याकडेच घ्यावी, यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) समर्थकांनी त्यांची भेट घेऊन आग्रह धरला आहे. तसेच, ही जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास आपण इतर उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी घेतली आहे. दुसरीकडे विद्यमान आमदारांना जागा सोडण्यात येईल, या नियमानुसार महायुतीमधील इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तर, काही दिवसांपूर्वी कागलमध्ये समरजीत घाटगे यांनीही तुतारी हाती घेतली होती. मात्र, आता कागल विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते. कारण, कागलमधून आता शिवसेना पक्षानेही दंड थोपटले आहेत. आपण विधानसभा निवडणूक (Vidhansabha) लढवणार असल्याची घोषणाच विरेंद्र मंडलिक यांनी केली आहे. हसन मुश्रीफांनीच राजकारणात आपला पाय ओढल्याचा आरोप करत विरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकलाय. 


कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमधील धुसपुस चव्हाट्यावर आली आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीलाच सोडली जाईल. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आलाय. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची त्यांनीच जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मंडलिक गटाच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यचाी घोषणा केली. तसेच, गेली 25 वर्षे हसन मुश्रीफ आमदार आहेत. त्यामुळे, आता त्यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कमबन्सी आहे. कागलमधील नैसर्गिक जागा शिवसेनेची, त्यामुळे महायुतीत जागा शिवसेनेलाच मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचंही विरेंद्र मंडलिक यांनी यावेळी म्हटलं. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा कागलच्या जागेवर ठिणगी पेटणार असल्याचे दिसून येते. 


हसन मुश्रीफ व सरमजीत घाटगेंमुळे 14 हजारांचं लीड


हसन मुश्रीफ यांनी कायम खेकड्याप्रमाणे माझे पाय ओढले, तर लोकसभा निवडणुकीत देखील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांनीही प्रामाणिकपणे काम केलं नाही, असा आरोपच मंडलिक यांनी केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुती ओबीसीद्वेषी असा निरेटिव्ह तयार करण्यात आला, पण आपण दलित, मुस्लिम समाजाला महायुतीने समान न्याय दिला. लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी 20 ते 22 दिवस वाट बघायला लागली, जे तुतारीकडे गेले त्यांच्यामुळे ही वाट बघायला लागली. स्वकीयांच्या वागण्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. लोकसभेला आमच्या विरोधात असलेले संजयबाबा घाटगे यांनी आता मुश्रीफ यांना पाठींबा दिला, समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना जनक घराणं आणि आताचं घराणं एकच आहे, तुम्हाला काय करायचं ते करा असे सांगितले. मुश्रीफ साहेब यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना शाहू महाराजाना मदत करण्याचे सांगितले. समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी प्रामाणिक काम केलं नाही, म्हणून कागलमध्ये आमचं लीड 14 हजार झाल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापरही विरेंद्र मंडलिक यांनी कागलमधील या दोन्ही नेत्यांवर फोडले आहे. त्यामुळे, महायुतीमधील हा तिढा कसा सुटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 


हेही वाचा


हरियाणात भाजपची ऐतिहासिक हॅटट्रिक, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय; लोकसभेनंतर मोठा दिलासा