पुणे : निवडणूक आयोगाने दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचेही वेध सर्वांना लागले आहेत. त्यानुसार, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना यंदाच्या विधानसभेला रंगणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुन वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, या तीन पक्षांच्य जागावाटपात अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यातच, बारामतीच्य जागेसंदर्भात अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. आता, इंदापूर विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण, इंदापूरच्या जागेबाबत भाजप नेते आणि आमदार हर्षवर्धन पाटील आग्रही आहेत. तर, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांवेळी आम्हाला शब्द दिला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. 


इंदापूरच्या जागेबाबत हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट शब्दात भूमिका उघड केली आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या दत्तात्रय भरणेंचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला महायुतीचा धर्म म्हणून सुनेत्रा पवारांचं काम करायला सांगितलं होतं. तुम्हालाही माहिती आमचा-त्यांचा 25/30 वर्षांचा राजकीय संघर्ष आहे. पण, आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणे लोकसभेला काम केले. लोकसभेवेळी बंद दारावर चर्चा झाली ती मी इथं सांगणार नाही, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसमोर कबुल केलं होतं. इंदापूरबाबत जो तुम्ही निर्णय घ्याल, त्याला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या जागेवर दावा केला आहे. दरम्यान, अजून जागा वाटपाची चर्चा होणं बाकी आहे, त्यामुळे ही जागा कुणाला जाते हे पाहणं महत्त्वाचा असणार आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.  


लोकसभेला आम्ही मदत केली


1995 ला आमच्यावर अन्याय झाला त्यावेळी आम्ही उठाव केला, तेव्हापासून आम्ही संघर्ष करीत आहोत. मी सध्या लोकांच्या भावना जाणून घेत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना मदत केली. आम्ही फक्त मदतच करायची का असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. लोकसभेला आमचे नेतृत्व चांगलं असतं, मग असं काय तीन महिन्यात घडतं की ह्यांना बाजूला करा, असा विचार येतो. याचा राग सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे, असेही पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.  


आम्ही कुणाच्या रुपयात मिंदा नाही


लोकसभेमध्ये आमची ताकद असते पण विधानसभेला नसते, असं का होतं. काही लोकांची भावना असेल की विधानसभेत हर्षवर्धन पाटील आला नाही पाहिजे. जर आम्ही चांगली माणसं नसू तर आमची लोकसभेला मदत का लागते?, असा सवालही पाटील यांनी विचारला आहे. आम्ही कुणाच्या एक रुपयात मिंदा नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल तर मला माहित नाही. हर्षवर्धन पाटलांना एकटा पाडलं पाहिजे का, टार्गेट केलं पाहिजे का, विधानसभेतून बाजूला केलं जातं का? हा संघर्ष अनेक वर्ष झाले सुरू आहे. 


इंदापूरची जागा महायुतीचीच


या निवडणुकीत दोन नेत्यांशी चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत याचा विचार आणि अभ्यास त्यांनी करावा आणि निर्णय घ्यावा. बारामतीची जागा अजित पवारांना जाणार आहे, त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हा त्यांचा अधिकार आहे. पण, इंदापूरची जागा राष्ट्रवादीची आहे याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. इंदापूरची जागा ही महायुतीची आहे. अजित पवार कुठून उभा राहतील हे माहीत नाही, पण इंदापूरची जागा ही महायुतीची आहे, असे स्पष्ट शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.