पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्याला काल (शनिवारी) उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर आता काही वर्षांतच दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली. दोन्ही बंधू कुठे इतरत्र एकत्र दिसले की त्यांनी एकत्र यावे अशी चर्चा होत असे. या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर ठाकरे कुटुंबाचे व्याही असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ज्यावेळी महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येईल आणि सर्व मराठी माणूस एकत्र येईल त्यावेळी वेगळे काही सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणावर भाष्य केले. आम्ही या दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत करतो. दोन्ही भावांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्याचे आम्ही स्वागत करतो असंही पुढे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचा बोलण्यासाठी नकार
पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यात एका विवाह समारंभासाठी पोहोचले. यावेळी हेलिपॅडवर स्वागत करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढाचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांना (Sharad Pawar on Raj and Uddhav Thackeray) राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल विचारण्यात आले. मात्र, शरद पवार यांनी दोघांच्या घडामोडींवर बोलण्यास नकार दिला. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.