Hadgaon Vidhansabha Election : लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhasabha Election) आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापपैकी आज आपण हदगाव विधानसभा (Hadgaon Vidhansabha) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत.


2019 च्या निवडणुकीत काय स्थिती होती?


हदगाव  विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेला हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हदगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे विजयी झाले होते. माधवराव पाटील जवळगावकर हे 74,325 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार बाबूराव कोहळीकर यांचा पराभव केला. तर त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नागेश पाटील अष्टिकर हे विजयी झाले होते. त्यांनी त्यावेळी काँग्रेस पक्षाचे जवळगावकर माधवराव निवृत्तीराव पाटील यांचा पराभव केला होता.  


यावेळी नेमकं काय होणार? 


राज्यात दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  पुढच्या काही दिवसातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. हदगाव  मतदारसंघात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. जागावाटपात ही जागा कोणाला जाईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. महाविकास आघाडूकडून ही जागा काँग्रेसच्या माधवराव पाटील जवळगावकर यांना पुन्हा सुटण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेला पराभूत झालेले उमेदवार बाबूराव कोहळीकर हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून सुभाष वानखेडे हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. वानखेडे हे 15 वर्ष आमदार होते तर एक वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.


हदगाव विधानसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरणार 


दरम्यान, यावेळी हदगाव विधानसभा मतदारसंघाची लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. कारण, महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसच्या माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट दिले तर ठाकरे गटाकडून सुभाष वानखेडे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत बंडखोरी होणार का? हा देखील चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून लोकसभेला पराभूत झालेले उमेदवार बाबूराव कोहळीकर हे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी: नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर