Gujarat Assembly Elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीची रंगात आता वाढली असून सगळेच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यातच आता गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अवघे सात दिवस उरले आहेत. अशातच गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा मंगळवारी अहमदाबादच्या नरोडा आणि दरियापूर विधानसभेत प्रचारासाठी पोहोचले. यावेळी ते प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले आहेत की, "जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून पाकिस्तानला माहित आहे की, जर त्याने भारतात 2 बॉम्बस्फोट केले, तर इथून पाकिस्तानमध्ये 20 बॉम्बस्फोट होतील".


'देशात समान कायदा लागू करण्याची गरज'


यावेळी प्रचार सभेत बोलताना श्रद्धा हत्याकांडाचा दाखला देत हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले की, ''देशात लव्ह जिहादला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशात समान कायदा लागू करण्याची गरज आहे.'' ते म्हणाले की, ''आज भारतात एक वर्ग असा आहे, ज्या वर्गातील व्यक्तीला एक लग्न करण्याचे स्वातंत्र्य आहे, नंतर काही दिवसांनी दुसरे लग्न करण्याचे आणि काही दिवसांनी तिसरे लग्न करून घटस्फोट देत राहिल्यास चौथे आणि पाचवं लग्न करण्याचंही.'' शर्मा म्हणाले की, या देशात समान नागरी संहितेची गरज आहे. हे काम फक्त भाजपच करू शकते. ते म्हणाले, महिला सक्षमीकरणाचे काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, त्यामुळे मोदींना ताकद द्यावी लागेल.


ते म्हणाले, “मोदींना सत्तेवर येऊन 7-8 वर्षे झाली आहेत. आज जर तुम्ही तवांगला गेलात तर तिथे हायवे आहे आणि रेल्वेचे काम चालू आहे. आज चीन जर ल्हासाहून तवांगला दोन तासांत पोहोचला तर भारतीय लष्कर तेजपूरहून एका तासात पोहोचू शकते. यापूर्वी 14 दिवस लागायचे. आज आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. लडाख, जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशही सुरक्षित आहेत.


2017 च्या निवडणुकीत काय होती परिस्थिती 


दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोडासा जागा कॉंग्रेसने सुमारे 1,600 मतांच्या फरकाने जिंकली होती. तर दरियापूर कॉंग्रेसने 6,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली होती. भाजपने आपला बालेकिल्ला असलेल्या नरोडा मतदारसंघावर 60,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. गुजरात विधानसभेची निवडणूक यावेळी दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.