Raj Thackeray On Governor Bhagat Singh Koshyari: 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. यावरूनच अनेक नेते त्यांच्यावर टीका करत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींची होशियारी? असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्राचा इतिहास माहित नसेल तर बोलू नका, असं देखील ते म्हणाले आहेत.


काय म्हणाले राज ठाकरे? 


कोश्यारी यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल, तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, असं ते म्हणाले आहेत.


राज ठाकरे म्हणाले की, उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. 


राज्यपालांच्या बोलण्याचे विरुद्ध अर्थ काढण्यात आले आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दरम्यान, कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पुर्थ्वीवर आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचे देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंख नाही. मला वाटत नाही की, राज्यपालांच्या मनात देखील याबद्दल शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे विरुद्ध अर्थ काढण्यात आले आहेत, असं ते म्हणाले आहेत.     


इतर महत्वाची बातमी: 


Mahatma Gandhi: गांधींना मारण्यासाठी गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचा आरोप