Goa Congress Resignation : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या महत्त्वपूर्ण गोवा दौऱ्यापूर्वीच गोवा काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाच्या तब्बल 108 बूथ लेव्हल एजंट्सनी (BLA-2) आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रांच्या प्रती जाहीर केल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी आणि अस्वस्थता उघड झाली आहे. खरगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजीनामे सत्र सुरू झाल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे आपल्या गोवा दौऱ्यादरम्यान बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी (Booth Level Agent) थेट संवाद साधणार होते. मात्र, त्याआधीच तळागाळातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्यांचे शस्त्र उपसल्याने राष्ट्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्ते (BLA) हेच कोणत्याही पक्षाच्या संघटनेचा मुख्य आधार असतात, त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

निर्णयप्रक्रियेवर कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी

काँग्रेस पक्षाकडून सातत्याने तळागाळातील संघटना मजबूत करण्याचे दावे केले जातात; परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीत कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. पक्षातील महत्त्वाच्या बैठका, निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना डावलून केवळ मोजक्या नेत्यांच्या प्रभावाखाली निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Continues below advertisement

प्रदेशाध्यक्ष बदलामुळे असंतोषात वाढ?

गोवा काँग्रेसमधील या अंतर्गत संघर्षामागे अलीकडच्या काळातील काही कारवाईची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशीम खान आणि सोशल मीडिया विभागाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर पक्षाने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईमुळे पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाले असून, कार्यकर्त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसे व्यासपीठ मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय नेतृत्वापुढील मोठे आव्हान

गोव्यात काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व प्रयत्नशील असतानाच, पक्षाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या BLA-2 पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ ही विरोधाभासी परिस्थिती निर्माण करणारी ठरली आहे. मोठ्या नेत्यांचे दौरे आणि सभांपेक्षा तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे बनले आहे. आता खरगे या नाराजीची कशी दखल घेतात आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा: