Ganshotsav 2023: मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलंय. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱ्या पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणं अयोग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. 


येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघ आणि मुंबईतील मूर्तिकार संघटनेच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या आठवड्यामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या बाबतीत जे निर्णय घेतले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.


मात्र, पीओपीच्या चार फुटाखालील गणेश मूर्त्यांवर बंदी घालण्यासंदर्भात मुंबई महापालिकेने घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही, म्हणत या निर्णयाला आशिष शेलार यांनी विरोध दर्शवला आहे. मुंबई पालिकेने समुद्र स्वच्छ होण्यासाठी, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य यंत्रणा का निर्माण केली नाही? असा सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केला.


घरातून निघणाऱ्या सांडपाण्याने वर्षानुवर्षे मुंबईतील समुद्र खराब होत असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याबाबत 25 वर्ष महापालिकेतील सत्ताधारी झोपले होते काय? असा सवाल देखील शेलारांनी केलाय. आज गणपतीच्या मुर्त्यांमुळेच जणूकाही समुद्र आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असं भासवलं जात आहे आणि या गोष्टी आम्हाला कदापि मान्य नसून आमची भूमिका सरकारपुढे मांडली आह, असंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.


राज्य सरकारच्या वतीने पीओपी मूर्तीच्या वापराबद्दल जी समिती नेमण्यात आली आहे, त्याबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, ज्यांनी याबद्दलचा प्रयोग शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केला आहे अशा शास्त्रज्ञांना समितीत घेण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं ते म्हणाले. अलीकडेच रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार घडवण्याचा प्रकार काहीजणांनी केला आणि पोलिसांनी त्यांना पकडल्याचं ते म्हणाले.


गणेशोत्सव विसर्जनाचा मार्ग ठरलेला असून त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असं शेलर म्हणाले. तसेच गणेशोत्सवामध्ये कुठल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य न वापरता, रात्री दहा नंतर काहीकाळ आरत्या सुरू राहिल्या तर त्यात बिलकुल अडकाठी आणता कामा नये, अशीही मागणी शेलारांनी केली आहे. राज्य सरकारने त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निर्देश दिले आहेत आणि त्याबाबत समाधानी असल्याचंही आशिष शेलार म्हणाले.


हेही वाचा:


New Parliament : होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण... असं आहे नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल